। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पाली शहरात नगरपंचायतीतर्फे नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. तसेच, जवळपास दीड कोटींची गटारे व नाले बांधणीची कामे प्रगतीपथावर आहेत. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व गटारे आणि नाले बांधणीची सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. परिणामी पालीत पावसाळ्यात गटारे व नाले तुंबण्याचा धोका राहणार नाही. तसेच, येथील दुर्गंधी संपुष्टात येईल. ठरलेल्या नियोजनाद्वारे येथील वेगवेगळ्या ठिकाणची नालेसफाई टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. पाणी बॉटल, प्लास्टिकच्या पिशव्या, घरगुती कचरा व गाळ यामुळे येथील बहुसंख्य ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबली आहेत. नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी नियमित नालेसफाई करतात. पावसाळ्यापूर्वी होत असलेली नालेसफाई ही अत्याधुनिक यंत्र व जेसीबीच्या साह्याने अधिकची माणसे घेऊन करण्यात येत आहे. त्यामुळे तुंबलेली गटारे व नाले पूर्णपणे साफ होत आहेत.