जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
| पाली | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाल्याने प्रवासी जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. गर्भवती महिला, रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचत नसल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. सद्यःस्थितीत महामार्गावर 30 फूट लांबीचे तर 3 फुटी खोल खड्डे पडलेले असतानाही, सरकार व प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. खड्ड्यांमुळे महामार्गाची दाणदाण उडालेली असताना सत्ताधारी मात्र कुरघोडीच्या राजकारणात व्यस्त आहे, असा आरोप मनसे नेते हरिश्चंद्र तेलंगे यांनी केला आहे. महामार्गावरील खड्डे तात्काळ भरले नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महामार्गावर जीव मुठीत घेऊन होतोय प्रवास करण्याची नामुष्की ओढवली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता काही समजत नाही. आजघडीला महामार्गावर मोठमोठे जीवघेणे खड्डे व जागोजागी चिखल, खडी आहे. या मार्गाची दाणादाण उडालेली आहे. अशातच महामार्गावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य असून, प्रवासी वाहनचालकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. मोटारसायकलस्वार कोसळत आहेत, जखमी होतायत, खड्ड्यात बस फसत आहेत, तर वाहनांमध्ये सतत बिघाड होऊन खिशाला कात्री बसतेय, अशा तक्रारी व ओरड वाहनचालकांमधून होतेय. सरकारला अजून किती निष्पाप जीवांच्या मृत्यूची प्रतीक्षा आहे, असा सवाल जनतेतून होत आहे.
मागील वर्षीदेखील या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. या वर्षी काही ठिकाणी रस्ता अजून सुस्थितीत आहे. परंतु कामाचा निकृष्ट दर्जा, अवजड वाहने आणि मुसळधार पावसात या रस्त्याचा देखिल टिकाव लागला नाही. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना यंदाच्या पावसाळ्यातसुद्धा खड्ड्यांचा सामना करावा लागला आहे. लवकरात लवकर हा मार्ग सुस्थितीत आणावा, अशी मागणी तेलंगे यांनी केली.
अपघाताच्या घटनेत वाढ
गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचे आदेश दिल्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली खरी, मात्र पुन्हा रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. सध्या सायंकाळी येणार्या मुसळधार पावसामुळे बुजवलेल्या खड्ड्यांतील माती, दगड रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार वाढले आहेत. पेण तालुक्यातील हमरापूर, तरणखोप, रामवाडी, उचेडे, वडखळ, डोलवी, खारपाले, कोलेटी, वाकण, नागोठणे, सुकेळी, कोलाड, वरसगाव, इंदापूर लगत महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर, काही ठिकाणी बुजवलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत.
महामार्गावर पावसामुळे पडलेले खड्डे तात्काळ भरण्यात येत आहेत. पावसामुळे खड्डे भरण्यात अडचणी येत आहेत. तरी मोठ्या खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गावरील आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. पाऊस थांबताच डांबरीकरण करण्यात येईल.
– मधुकर आडे, अभियंता, सुप्रिमो इन्फ्रास्ट्रक्चर
अजून किती आंदोलने करावी म्हणजे सरकारला जाग येईल, अजून किती निष्पाप जीव गेल्यावर हा मार्ग होईल, ज्याच्या घरातील व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडते त्यांच्या वेदना व दुःख काय असते याची जाणीव शासनकर्त्यांना नाही.
– हरिश्चंद्र तेलंगे, मनसे नेते