प्रगती साधताना अलिबागचे वेगळेपण जपा – आ.जयंत पाटील

मी होणार स्वावलंबी उपक्रमांतर्गत शिलाई मशीनचे वाटप
। अलिबाग । वार्ताहर ।

अलिबागच्या स्थानिकांनी व्यवसायातून पुढे जायला हवे. परंतु, अलिबागची मुंबई व्हायला फारसा वेळ लागणार नाही त्यामुळे एकीकडे प्रगती करत असताना दुसरीकडे अलिबागचे वेगळेपण जपणे हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी शनिवारी अलिबाग येथे केले.


सध्याच्या काळात महिलांनी फक्त शिक्षण घेऊन आणि नोकरी करून उपयोग नाही तर, स्वतःची आवड आणि कला जोपासत स्वतःला आर्थिकरित्या सक्षम बनविणे गरजेचे आहे. आणि ही बाब लक्षात घेत पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह, शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मी होणार स्वावलंबी हा उपक्रम सुरू केला. या अंतर्गत महिलांना शिवणकला आणि फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले. परंतु नुसतेच प्रशिक्षण नव्हे तर रोजगार निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचे असणारे भांडवल म्हणजेच शिलाई मशीनही शनिवारी (दि.11) शेतकरी भवन येथे शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्या.


यावेळी मा. जि.प.सदस्य प्रियदर्शनी पाटील, मा. उपनगराध्यक्ष अ‍ॅड मानसी म्हात्रे, नगरसेवक, गटनेते प्रदीप नाईक, अलिबाग पं.स. मा. सभापती प्रमोद ठाकूर, मा. उपसभापती मिनल माळी, चेंढरे सरपंच स्वाती पाटील, पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, सिएफटीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी अमित देशपांडे तसेच यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, पीएनपी एज्युकेशनचे सोसायटीचे कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.


चित्रलेखा पाटील कोरोना बाधित असल्यामुळे सदर कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत.यावेळी बोलताना जयंत पाटील यांनीअलिबागमध्येच बचत गटाची इमारत उभारून त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण सुरू करणार असल्याचे जाहीर केले.शिवाय अलिबाग-वडखळ 2 लाईन रस्ता विदाऊट अ‍ॅक्विशन तसेच रस्त्याच्या मध्ये लाईट्स तसेच धबधब्यांच्या ठिकाणी टेन्ट उभारून आधुनिकरित्या पर्यटन सुरू करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार असल्याचेही नमूद केले.

4 मे ते 10 जून या कालावधीत 50 महिलांना 3 वर्गांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांची परीक्षा घेण्यात आली. तसेच या 50 महिलांपैकी 96 टक्के हजेरी व कौशल्यापूर्ण प्रशिक्षण घेणार्‍या महिलांपैकी सर्वोत्कृष्ट तीन महिलांचा त्यांना प्रशिक्षण देणार्‍या प्रशिक्षक शिफा कादरी आणि जयश्री साळवी व अगदी महिलांच्या नाव नोंदणीपासून ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमापर्यंत नियोजन आणि सहकार्य करणारे पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक या सर्वांचा आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व महिला प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. तसेच पुढच्या आठ दिवसांत शिवणकलेचा अ‍ॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग हा कोर्स सुरू होणार आहे.

चित्रलेखा पाटील यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या शिवणकला आणि फॅशन डिझायनिंगच्या प्रशिक्षणातून अनेक महिलांना रोजगारासाठी वाट मिळाली आहे.

आ.जयंत पाटील
Exit mobile version