पनवेल जंक्शनवरील ताण होणार कमी

सोमाटणे-चिखली कॉर्ड लाईनला 172 कोटींची मंजुरी

| पनवेल | प्रतिनिधी |

रेल्वे पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी भारतीय रेल्वेने सोमाटणे-चिखली रेल्वे कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील 3.7 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामुळे पनवेल जंक्शनवरील रेल्वे वाहतुकीचा ताण कमी होण्यासह मालवाहतुकीची कार्यक्षमता वाढण्यास मदत
होणार आहे.

सध्या कर्जत मार्गावरून रोहाच्या दिशेने जाणाऱ्या मालगाड्यांना पनवेल जंक्शनमध्ये प्रवेश करून इंजिनची दिशा बदलावी लागते. या प्रक्रियेमुळे वेळेचा अपव्यय होत असून पनवेल स्थानकावरील वाहतुकीवर अतिरिक्त ताण निर्माण होतो. प्रस्तावित कॉर्ड लाईनमुळे चिखली (कर्जत मार्ग) आणि सोमाटणे (रोहा मार्ग) यांच्यात थेट रेल्वे जोडणी निर्माण होणार आहे. त्यामुळे मालगाड्यांना पनवेलमध्ये प्रवेश न करता थेट मार्गाने प्रवास करता येणार आहे.

पनवेल एलिव्हेटेड कॉर्ड लाईन प्रकल्पाच्या एकात्मिक आराखड्याचा भाग असलेल्या या मार्गामुळे प्रत्येक मालगाडीचा सुमारे 110 मिनिटांचा विलंब टळणार असल्याचा अंदाज आहे. परिणामी रेल्वे नेटवर्कवरील गर्दी कमी होऊन मालवाहतुकीचा वेग वाढणार आहे. देशातील प्रमुख कंटेनर बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मार्गावरील मालवाहतुकीलाही या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या अंदाजानुसार, नव्या कॉर्ड लाईनमुळे दरवर्षी अतिरिक्त नऊ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळणे शक्य होणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

प्रकल्प खर्च : 172 कोटी रुपये

मार्ग लांबी : 3.7 किलोमीटर

जोडणी : चिखली (कर्जत मार्ग) ते सोमाटणे (रोहा मार्ग)

प्रत्येक मालगाडीचा सुमारे 110 मिनिटांचा वेळ वाचणार

पनवेल जंक्शनवरील वाहतुकीचा ताण कमी होणार

जेएनपीटीकडे जाणारी मालवाहतूक अधिक वेगवान होणार

दरवर्षी अतिरिक्त 9 दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्याची क्षमता
Exit mobile version