| खरोशी | प्रतिनिधी |
पेण शहरात सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांदरम्यान मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा होत असून, वारंवार जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. परिणामी पाणीटंचाईच्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. तसेच दुरुस्तीचा अतिरिक्त आर्थिक भार नगरपरिषदेवर पडत असल्याची चिंता निवृत्त अभियंता जीवन शंकर पाटील यांनी व्यक्त केली.
रविवारी (दि. 12) हनुमान मंदिर परिसरात खोदकाम करताना 9 इंच व्यासाची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. संबंधित जलवाहिनीची नंतर नगरपरिषदेकडून दुरुस्ती करण्यात आली, मात्र यामुळे प्रशासनावर आर्थिक ताण वाढला.कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराचा जबाबदार प्रतिनिधी किंवा नगरपरिषदेचा अधिकारी अनुपस्थित असल्याने कामे मनमानी पद्धतीने होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे.
रस्ते कामे सुरू करण्यापूर्वी जलवाहिन्यांचे अचूक नकाशे कंत्राटदारांना उपलब्ध करून देणे, कामाच्या ठिकाणी अधिकृत अभियंता किंवा सुपरवायझर उपस्थित ठेवणे आणि जलवाहिनी फुटल्यास त्याचा दुरुस्ती खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करणे आवश्यक असल्याची मागणी जीवन पाटील यांनी केली आहे. भविष्यातही अशीच निष्काळजीपणा सुरू राहिल्यास पाण्याचा मोठा अपव्यय होऊन त्याचा आर्थिक भार अखेरीस नागरिकांवरच पडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.







