पूररेषेमुळे भेडसावताहेत समस्या

विकास आराखडा बैठकीत नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव नगरपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी शासनाने आयोजित केलेल्या बैठकीत पूररेषामुळे नागरिकांना भेडसावणार्‍या समस्यांचा नागरिकांनी संबंधित अधिकार्‍यापुढे पाढाच वाचला. जलसंपदा विभागाने सर्व्हे करून माणगाव नगरपंचायत हद्दीतील रेड आणि ब्लू लाईनमुळे विकास होत नसून, अनेक अडचणींना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत नवी मुंबई येथील नगररचना विभाग सहसंचालक जितेंद्र भोपळे यांच्या पुढे समस्या मांडून उपाययोजना आखण्याबाबत मार्गदर्शन व अत्यावश्यक सुधारणा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी या बैठकीत प्रामुख्याने करण्यात आली.

माणगाव प्रशासकीय भवन सभागृहात ता 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजता बैठक संपन्न झाली. त्यावेळी जितेंद्र भोपळे व संबंधित अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली. त्यावेळी नवी मुंबई नगर रचनाकार राजेंद्र चव्हाण, नगर रचना अधिकारी रायगड सतीश उगीले, नगर रचनाकार जी.के. थोंटे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव, माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, अ‍ॅड. राजीव साबळे, माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामुगडे, मुख्याधिकारी राहुल इंगळे, पाटबंधारे विभागातील अधिकारी तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, नागरिक व सर्व पक्षाचे कार्यकर्ते, बिल्डर्स असोसिएशनचे नेते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. भोपळे म्हणाले की, पूरदर्शक रेषेविषयी जलसंधारण विभागामार्फत लाल व निळ्या लाईन सुधारित करता येईल का, अशी बाजू जलसंधारण विभागाला तपासण्यास सांगितले व वरील नागरिकाच्या मागणीचा विचार हा माणगाव नगरपंचायत आराखडा तयार करताना नक्कीच विचारात घेतला जाईल. अशाही सूचना त्यांनी दिल्या.

Exit mobile version