| मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.जी. जी. पारीख,महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना बुधवारी 9 ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जाण्यास मनाई करण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी केला. तुषार गांधी यांना सांताक्रुझ पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवण्यात आले तर इतर कार्यकर्त्यांना भडकमकर मार्ग पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवण्यात आले. समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी सकाळी गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापाशी एकत्र जमून तिथून शांतीमार्च काढीत ऑगस्ट क्रांती मैदानावर जाऊन तेथे हुतात्म्यांना अभिवादन करीत. यंदा शांतता भंग होईल, म्हणून सरकारने पोलिसांच्या माध्यमातून 149ची नोटीसच दिली नाही तर शांतीमार्च काढण्यास मनाई केली. आणि टिळक पुतळ्या जवळ असलेल्या उपस्थित अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात मधू मोहिते, प्रभाकर नारकर,जगदीश नलावडे,नितीन अणेराव, विश्वास उटगी, दीपक राक्षे, देवी गुजर,विजय तांबे, विजया चौहान, जया तावडे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता. आ.वर्षा गायकवाड, भाई जगताप, युवराज मोहिते आदींनी भडकमकर मार्ग पोलीस स्टेशन मध्ये जावून अटक करण्यात आलेल्या या आंदोलकांची भेट घेतली.मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि माजी खासदार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनीही मधु मोहिते, विजया चौहान यांची भेट घेवून पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध केला आहे.
डॉ.जी.जी.पारीख यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीशीमध्ये आपण किंवा आपल्या हस्तकां करवी कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केले त्यामुळे काही अनुचित प्रकार घडून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नोंदविलेले आहे. शंभरीमध्ये प्रवेश केलेल्या जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकाशी नोटीस पाठवताना कोणते शब्द वापरायचे याचे भान ठेवणे गरजेचे आहे. डॉ.जी.जी.पारीख यांचे सहकारी, समर्थक, कार्यकर्ते असू शकतात त्यांचे हस्तक कसे काय असू शकतात असे प्रश्न आता कार्यकर्ते विचारीत आहेत.