भरण्यासाठी ‘क्यूआर’ कोडची सुविधा उपलब्ध
| पनवेल । वार्ताहर ।
नागरिकांना अनेकवेळेला आपला मालमत्ता कर भरायचा असतो, परंतू पावती गहाळ झाल्याने नेमका आपला कर किती आहे, त्यावर किती व्याज लागले, आताच्या स्थितीला आपल्याला मालमत्ता करापोटी किती पैसे भरावे लागतील असे अनेक प्रश्न पडलेले असतात. या सर्व प्रश्नांवरती पनवेल महापालिकेने क्यू आर कोडचा उपाय शोधला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने मालमत्ता कर भरणे अत्यंत सोपे केले आहे. मनपाच्या प्रत्येक नागरी सेवा केंद्रावरती हे क्यू आर कोडचे तंत्रज्ञान विकसित करून देण्यात आले आहे. प्रत्येक मालमत्तेकरीता एक वेगळा क्यू आर कोड देण्यात आला आहे. हा क्यू आर कोड स्कॅन केला की, या सर्व प्रश्नाची उत्तरे लगेच मिळणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा पनवेल महापालिकेने ही सुविधा नागरिकांसाठी कार्यान्वित केली आहे. बरेचदा मालमत्ता कराची पावती गहाळ होते, किंवा अनेक दिवसांपासून कर न भरल्याने नेमका दंडासह आपल्याला किती कर भरावा लागेल हे माहित नसते. मात्र आता महापालिकेकडून नागरी सेवा केंद्रावर कर धारकांकरिता एक क्यू आर कोड विकसित करून देण्यात आला आहे. हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर मालमत्ताधारकांना करापोटी किती रक्कम भरायची आहे, याची इत्थंभूत माहिती त्वरीत त्यांच्या मोबाईल स्क्रिनवर दिसेल. त्यानंतर भीम, युपीआय, गुगल पे, फोन पे किंवा इतर ऑनलाईन आर्थिक व्यवहार सुविधेतून लगेचच कराचा भरणा करता येणार आहे. तसेच याद्वारे मालमत्ता कर भरणार्या मालमत्ता धारकांना दोन टक्के अधिकची सवलत मिळणार आहे. कर धारकांना मालमत्ता कर भरणे सोपे जावे या हेतूने ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून याचा जास्तीत जास्त कर धारकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.