नृपाल पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन
। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील नागाव हायस्कूल येथे मंदार वर्तक मित्रमंडळ, नागाव-आक्षी आयोजित रायगड श्री 2022 शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. 26 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. कोकण बॉडी बिल्डींग फिटनेस अँड फिजिक स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन यांच्या सहकार्यातून रायगड जिल्ह्यात प्रथमच अॅथलिट फिजीक व मेन फिजीक, बॉडी बिल्डिंग अशी एकत्रित असलेली स्पर्धा महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरविण्यात येणार आहे.
रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्पर्धा विविध वजनगटात होणार असून, यात 55, 60, 65, 70, 75 किलो आणि 75 किलोहून अधिक अशा सहा वजनगटात ही स्पर्धा घेण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक चषक आणि रोख रकमेचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील यांच्यासह रायगड जिल्हा परिषदेचे प्रतोद अॅड. आस्वाद पाटील, जि.प. सभापती दिलीप भोईर, नगरसेविका चित्रलेखा पाटील, आरडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, अमिर ठाकूर, अलिबाग, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सरपंच निखिल मयेकर, वर्ल्ड चॅम्पियन ब्रांझ मेडल विजेते, दोन वेळा मास्टर कॅटगिरी मि. इंडिया, दोन वेळा महाराष्ट्र टायटल विनर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, एशिया चॅम्पियनशीप 2018-19 च्या ब्राँज मेडलिस्ट अदिती बंब, वर्ल्ड बॉडी बिल्डिींग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी चेतन पाठारे, गिनिज बुकमध्ये नोंद झालेले शॉर्टेज बॉडी बिल्डर प्रतिक मोहिते, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे लिगल अॅडवायझर विक्रम रोठे, कोकण बॉडी बिल्डिंग फिटनेस अँड फिजिक स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. किरण कोसमकर आदी मान्यवरांसह बॉडी बिल्डिंगमध्ये नावलौकिक मिळविलेले बॉडी बिल्डर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंदार वर्तक, विराज राणे, सिद्धेश राणे, ओंकार म्हात्रे, मनीष कवळे आदी मंडळाचे सभासद मेहनत घेत आहेत.