तळा बसस्थानकाची संरक्षक भिंत धोकादायक

वेळीच दुरुस्ती न केल्यास अपघाताची शक्यता
| तळा | वार्ताहर |

तळा बसस्थानकालगत असलेली संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असून, या भिंतीची वेळीच दुरुस्ती झाली नाही तर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याआधी देखील एसटीची धडक बसल्यामुळे सदर भिंत कोसळली होती. या दुर्घटनेत रहाटाड येथील मच्छी विक्रेती महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर या भिंतीचे नव्याने काम करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने अवघ्या काही महिन्यांत ही भिंती कमकुवत झाल्याचे चित्र दिसत होते.

बसस्थानकात एसटी पार्क करताना बर्‍याचदा एसटीची मागील बाजू धडकत असल्याने दिवसेंदिवस ही भिंत कमकुवत होत चालली आहे. अशातच रविवारी चालक एसटी पार्क करत असताना मागील बाजूची धडक बसल्याने ही संरक्षक भिंत पूर्णपणे हलून तिचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळेस त्याठिकाणी कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या संरक्षक भिंतीची दुरुस्ती लवकरात लवकर न केल्यास अपघाताला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने त्वरित या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version