उरणमध्ये डॉक्टरवरील हल्ल्याचा निषेध

। उरण । वार्ताहर ।

उरण मेडिकल वेलफेअर असोसिएशन ही उरण मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांची पालक संघटना आहे. या संघटनेतर्फे कोलकत्ता येथील डॉक्टरवर झालेला अमानुष अत्याचार व हत्तेचा जाहिर निषेध करण्यात आला.

कोलकाता येथील आर.जी. कर मेडिकल कॉलेज मधील 31 वर्षीय ट्रेनी बेस्ट फिजिशियन महिला डॉक्टर वर 9 ऑगस्ट रोजी झालेला अमानुष अत्याचार व दुर्देवी मृत्युचा उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी जाहीर निषेध केला आहे. डॉक्टरांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांबाबत संघटनेने अनेक स्तरावर आपले मत परखडपणे मांडले आहे. या घटनेच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच रायगड मेडिकल असोसिएशनने राष्ट्रीय स्तरावर दि. 17 ऑगस्ट सकाळी 6:00 ते 18 ऑगस्ट सकाळी 6:00 वाजेपर्यंत इमरजेन्सी वगळता सगळ्या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे आवाहन संपूर्ण भारतातील डॉक्टरांना केले आहे. या निर्णयाला उरणच्या जनतेचा, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अधिकारी यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

संबंधीत आरोपीला त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी यासाठी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे उरण पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल नेहूल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना निवेदन देण्यात आले. तसेच, तहसील कार्यालयात तहसीलदार उद्धव कदम यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे डॉ. सुरेश पाटील, डॉ. सत्या ठाकरे, डॉ. संजीव म्हात्रे, डॉ. मनोज भद्रे, डॉ. अजय कोळी तसेच इतर पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version