नैनाग्रस्त शेतकर्‍यांच्या अटकेचा निषेध

बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

नैना क्षेत्रातील कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार्‍या भूमीपूजन कार्यक्रमाचा निषेध म्हणून शेतकर्‍यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे फडकवण्याचा निर्णय घेतला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी उत्कर्ष समितीचे अध्यक्ष वामन शेळके, अनिल ढवळे यांना सकाळी ताब्यात घेतले. त्यांना तात्काळ सोडून द्यावे, अशी मागणी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह शेतकर्‍यांनी केली. मात्र, पोलिसांनी त्यांना सोडले नाही. त्यामुळे ताब्यात घेतल्याचा निषेधार्थ शेकडो शेतकरी, महिला भगिनी पनवेल शहर पोलीस ठाण्यासमोर आले आणि त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत नैनाचा, अधिकार्‍यांचा निषेध करण्यात आला.

नैनाला आमची साठ टक्के जागा फुकट का द्यायची, असा सवालदेखील उपस्थित करण्यात आला. नैनाचे अधिकारी शेतावर मोजणी करण्यासाठी आल्यास त्यांना मारण्याचादेखील इशारा देण्यात आला. नैनामुळे 23 गावांतील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. या सरकारला शेतकर्‍यांविषयी खरंच कळवळा असेल, तर हा नैना प्रकल्प रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याठिकाणी आंदोलनादरम्यान शासनाकडून करण्यात आलेल्या योजना फसव्या असल्याचा पुनरुचार करण्यात आला. या शासनाला शेतकर्‍यांविषयी काहीही देणे- घेणे नसल्याचा आरोप केला गेला. पनवेलमध्ये अन्य प्रोजेक्ट सुरू असून, त्या प्रोजेक्टसाठी संपादित केलेल्या जमिनीचा शेतकर्‍यांना मोबदला देण्यात आला. मात्र, नैनामध्ये अशा प्रकारचा जमिनीचा कोणताही मोबदला मिळणार नसून, ती फुकट जमीन सिडको घेणार आहे. त्यामुळे या नैनारुपी राक्षसाला गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला आहे. दरम्यान, आंदोलक शेतकर्‍यांना वाढता पाठिंबा लक्षात घेत पोलीस प्रशासनाने नमते घेत अटक करण्यात आलेल्यांची सुटका केली.

Exit mobile version