| रसायनी | प्रतिनिधी |
गेल्या काही महिन्यांपासून रसायनी विभागात वीजपुरवठा रात्री बे रात्री खंडित होत असल्यामुळे वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. याअगोदर मोहपाड्यातील पत्रकार संघ व नविन पोसरी व्यापारी असोसिएशन यांनी निवेदन देऊन मोहोपाडा शिवाजी चौकात आंदोलनही करण्यात आले होते. यावेळी वीजवितरण अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देऊन पंधरा दिवसांत विजसमस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आठवडाभरातच लेखी आश्वासन देणाऱ्या वीजवितरणाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. दरम्यान, पावसाळा सुरू होण्यापूर्वी वीजवितरणाने थातुरमातुर कामे केली. तरीही दिवसातून अनेकवेळा वीज पुरवठा खंडित होत आहे. तसेच, रात्रीच्या वेळेस देखील वीज गायब होत आहे. दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहक संतप्त झाले आहेत. ही समस्या वीज ग्राहकांनी ठाकरे सेनेचे वासांबे मोहोपाडा विभागप्रमुख मंगेश पाटील यांना सांगताच त्यांनी मोहोपाडा वीजवितरण कार्यालयावर परिसरातील पदाधिकारी, व्यापारी, शिवसैनिकांना घेऊन मोर्चा वळविला व नव्याने आलेले उप अभियंता पवार यांना जाब विचारला. यावेळी शिवसैनिकांचा आक्रोश पाहून उप अभियंता पवार यांनी पंधरा दिवसांत वीजवितरणाच्या समस्या कायमचा मार्गी लावतो, असे आश्वासन दिले.







