11 गाव संघर्ष समितीकडुन वडखळ सरपंचाचा निषेध

। पेण । वार्ताहर ।
वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांनी डोलवी औद्योगिक क्षेत्राला (एमआयडीसी) शेतकर्‍यांचा विरोध असताना देखील चार टालकी एकत्र करत पाठिंबा दर्शविला. त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील हे शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. असे चुकीचे वक्तव्य केले. त्यामुळे 11 गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी तथा शेतकरी यांनी राजू मोकल यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच स्पष्ट केले की, जयंत पाटील यांना 11 गाव संघर्ष समितीने एमआयडीसीच्या निर्णयाविरूध्द लढण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात एकही अपशब्द शेतकरी ऐकून घेणार नाहीत. तसेच राजेश मोकल यांचे अज्ञान त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते. कमी शिक्षणामुळेच व स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असल्याने बेताल वक्तव्य राजेश मोकल करत आहेत.

ज्या पाटील घराण्याने कुळ कायदयाची मुहुर्तमेढ केली. स्व.ना. ना. पाटील (आप्पासाहेब) यांनी शेतकर्‍यांचा (7 वर्ष) संप प्रदिर्घकाळ चालवून सावकारांना धडा शिकवला. त्यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मोरारजीभाई देसाई यांना देखील चरी येथे यावे लागले. त्यावेळी एवढा मोठा शेतकर्‍यांचा सत्याग्रह फक्त आणि फक्त ना.ना. साहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली झाला. या संपाला भुतो ना भविष्य असे यश देखील आले. तेव्हापासूनच कसेल त्याची जमीन हा कायदा झाला. सेझच्या लढाईत अ‍ॅड. स्व.दत्ता पाटील स्वतः जयंत पाटील यांनी प्राध्यापक एन.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्व.मोहन पाटील यांच्या सहकार्याने लढ्यात भाग घेतला. असे असताना ज्यावेळी एमआयडीसी प्रस्तापित करण्यासाठी सरकार जमिनी ताब्यात घेत होते; त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांकडे शेतकरी मदतीसाठी गेला.आश्‍वासन सर्वांनी दिले. मात्र, मदतीसाठी कुणी पुढे आले नाही. त्यावेळी आ.जयंत पाटील, आ.रविशेठ पाटील व माजी आ.धैर्यशिल पाटील यांनीच आम्हा शेतकर्‍यांना लढण्याची दिशा दिली व सहकार्य केले. हे राजेश मोकल यांना माहित नसेल, असे परखड शब्दांत शेतकर्‍यांनी सुनावले.

शेतकरी सुज्ञ आहेत. त्यामुळे राजेश मोकल यांच्या सल्ल्याची शेतकर्‍यांना गरज नाही. ही बाब ही राजेश मोकल यांनी जाणून घ्यावी की, ज्या वेळेला डोलवी औद्योगिक क्षेत्राची अधिसुचना जारी झाली. त्यावेळी काही धनदांडग्यांनी या विभागातील जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या. त्यातुन शेतकर्‍यांची फसवणूक झाली. मात्र एकच व्यक्ती अशी होती की, ज्यांनी विधीमंडळात शेतकर्‍यांचा आवाज बुलंद केला. सरकारला कायदा करण्यास भाग पाडला. भविष्यात जर या जमिनी विकल्या गेल्या तर त्याच्या व्यवहारातून 50 टक्के रक्कम ही मुळ मालकाला मिळेल. असे असताना स्वतः च्या स्वार्थापोटी राजेश मोकल चुकीचे आरोप करत आहेत. खरच सरपंचाना विकास हवा असेल तर त्यांनी वडखळ ग्रामपंचायतीचाच विचार करावा. जेएसडब्ल्यू कंपनी येण्यापूर्वी वडखळ नाक्यावर असणारे दुकानदार सुजलाम सुफलाम नव्हते का? तसेच जुना मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 10 वर्षापासून बंद आहे. याकडे का लक्ष दिले नाही. तो रस्ता दुरूस्त असता तर आज वडखळ नाक्यावरील दुकानदारांची, व्यवसायिकांची जी अवस्था आहे, ती अवस्था नसती. तसेच वडखळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विकासाचा विचार करता रस्ते, पाणी, गटारे याचे नियोजन आहे का?

चार वर्षापूर्वी याच जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये 110 स्थानिक ठेकेदार होते. ते फक्त आज 10 वर आलेत. ज्या वेळेला कोलव्यासारख्या गावामध्ये खारबंदिस्तीला खांड जाते, त्या वेळेला सरपंच कोठे असतात. जर जेएसडब्ल्यू कंपनीमुळे स्थानिकांचा विकास होत असेल, तर दोन किमी अंतरावर असणार्‍या आदानी समुहाच्या सिमेंट कारखान्याला विरोध का? जमिनी मोजणीसाठी जे सहमतीपत्र दिले ते देखील जमिन मालकाव्यतीरिक्त सहया करून सहमतीपत्र दिले आहेत. असे सर्व असताना राजेश मोकल चुकिचे वक्तव्य करीत असतील तर त्यांच्या ज्ञानाची किव करावी लागेल. नक्की कोण कुणाची दिशाभूल करीत आहे, कोण दलालीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या जिवावर मलिंदा कमवायचा प्रयत्न करतो. शेतकर्‍यांच्या विरोधात भूमिका घेणार्‍या राजेश मोकल यांचा निषेध व्यक्त करीत शेतकर्‍यांनी त्यांना चांगलेच फटकारले आहे.

यावेळी के.जी म्हात्रे, निलेश म्हात्रे, प्रविण म्हात्रे, मोरेश्‍वर म्हात्रे, दत्तात्रय पाटील, सुभाष गजानन पाटील, प्रशांत पाटील, गणेश जांभळे, भाउ म्हात्रे ,संभाजी म्हात्रे, संतोष म्हात्रे, सदानंद म्हात्रे, घनश्याम बैकर, राजू पाटील, नितीन पाटील, प्रमोद पाटील, भिकाजी म्हात्रे, सुनील म्हात्रे , देवीदास म्हात्रे, नंदकुमार पेडवी, गजानन पेडवी, गजानन मोकल, अदींसह एम.आय.डी.सी. संघर्ष समितीचे पदाधिकारी यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी हजर होते

आम्ही एमआयडीसीच्या विरोधातच – मोरेश्‍वर म्हात्रे, कोलवे
राजेश मोकल यांनी माझी पत्नी सुरेखा मोरेश्‍वर म्हात्रे सदस्य ग्रुप ग्रामपंचयात वडखळ हिला फोन करुन मिटिंग असल्याचे सांगितले. तसेच ज्या ठिकाणी पत्रकार परिषद झाली त्या ठिकाणी बसविले. माझ्या पत्नीला पत्रकार परिषद कोणत्या सर्दत्रभात आहे याची काहीही कल्पना दिली नाही. राजेश मोकल हे चुकीच्या पध्दतीने स्वतःच्या फायदयासाठी हे करत आहेत. आम्ही एमआयडीसीच्या विरोधात असून अकरा गाव संघर्ष समितीसोबत आहोत.

28 एप्रिल 2021 ला एमआयडीसी भुसंपादनाला विरोध
28 एप्रिल 2021 ला झालेल्या मासिक सभेत राजेश मोकल यांचा विरोध
2 ऑक्टोबर 2021 ला झालेल्या ग्रामसभेमध्ये देखील राजेश मोकल यांचा एमआयडीसी प्रकल्पाला विरोध
3 डिसेंबर 2021 ला प्रांत अधिकार्‍यांना दिलेल्या पत्रामध्ये एमआयडीसीसाठी दिलेल्या भुसंपादनाला विरोध

असे वेळोवळी विरोधाचे पत्र काढणारे राजेश मोकल यांना एकाएकी साक्षातकार होउन एमआयडीसीमध्ये स्थानिकांची उन्नती होणार आहे, असे मत व्यक्त करतात. याचाच अर्थ राजेश मोकल हेच दिशाभूल करत आहेत, असा आरो 11 गाव संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे.

Exit mobile version