चिन्मय आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
| अलिबाग | प्रतिनिधी |
चिन्मय आम्हाला तुझा अभिमान वाटतोय, भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-3 मोहिमेचा तु एक छोटासा घटक होतास, पण तुझ्या या छोट्याशा कामगिरीनेही चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यास हातभार लागला, अशा अभिमानास्पद भावना आज तमाम रायगडवासियांच्या मनात निर्माण झाल्या आहेत. चांद्रयान तीनच्या यशस्वी मोहिमेत रायगडच्या सुपूत्राचाही सहभाग राहिला आहे. त्याच्या या यशस्वी कामगिरीमुळे संपुर्ण रायगडकांकडून अभिमान व्यक्त करण्यात येत आहे. चिन्मय संदीप म्हात्रे असे या तरुणाचे नाव आहे.
चिन्मय हा पेण तालुक्यातील आंबिवली येथील रहिवासी आहे. त्याचे वडील अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया कंपनीत उप व्यवस्थापक (जनरल) म्हणून नोकरीला असून आई गृहिणी आहे. चिन्मयचे दहावी पर्यंतचे शिक्षण मुरुड तालुक्यातील साळाव येथील वेलस्पून विद्या मंदिरमध्ये झाले. त्याने दहावीमध्ये 96.4 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर त्याचे बारावीचे शिक्षण नवी मुंबई येथील डीपीएस महाविद्यालयात झाले. त्याने बारावीच्या परिक्षेत 96 टक्के गुण मिळवून द्वीतीय क्रमांक मिळविला. शिक्षण घेत असताना, देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न चिन्मनने पाहिले. त्याला संशोधनाची आवड शालेय स्तरापासून होती. त्याची ही आवड ओळखून वडिलांनी त्याला इंजिनिअर क्षेत्रात शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहीत केले. संशोधन क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास त्याने सुरुवात केली. त्रिवेंद्रम येथे आयआयएसटी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
इस्त्रोमध्ये चिन्मयचे योगदान शिक्षण पुर्ण झाल्यावर त्याला बेंगळुरू येथील इस्त्रोमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. 23 ऑगस्ट 2019 मध्ये तो बेंगळुरू येथील यु.आर.राव सेटेलाईट सेंटरमध्ये तो काम करू लागला. सुरुवातीला पहिले दोन वर्षे थर्मो-व्हॅक्युम चेंबर फॅसिलिटीमध्ये काम केले. उपग्रहांसाठी ॲटीट्यूड आणि ऑर्बिट कंट्रोल सिस्टीम डिझाइन करण्याची जबाबदारी पडली. यशस्वी चंद्रयान मोहिममध्ये चिन्मयचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. या मोहिमेत त्याने चांद्रयानसाठी रोव्हर टीमचा एक भाग म्हणून काम केले आहे. ट्रॅकींग सेंटरमधून ग्राऊंड ऑपरेशनमध्ये सक्रीय सहभाग राहिला आहे. रोव्हरच्या मिशन लाईफ दरम्यान रोव्हरचे पथ नियोजन करण्याच्या टीमध्ये त्याने महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल देशासह, महाराष्ट्र, रायगडसह पेण तालुक्याचे नाव उंचावले आहे.