बाळास वाचविणार्‍या धाडसी ‘साक्षी’स अपंगत्वाचा दाखला प्रदान

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथील साक्षी दाभेकर हिला आज (बुधवार) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते 60 टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले. जुलै महिन्यात झालेल्या भीषण दुर्घटनेत साक्षी हिने जीवाची पर्वा न करता दोन वर्षीय मुलाचा प्राण वाचविला होता. या दरड पडल्याच्या दुर्घटनेत साक्षीचा पायास गंभीर दुखापत झाली होती. तिचा पाय निकामी झाल्याने तो कापावा लागला होता. काही दिवस साक्षी रुग्णालयात होती. आज तिला रायगड येथे 60 टक्के अपंगत्वाचा दाखला प्रदान करण्यात आला.

अतिवृष्टीमुळे पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावचा डोंगर कोसळून पायथ्याशी असलेली सहा घरे दरडीखाली गाडली गेली होती. या दुर्घटनेत पाच जणांचा दरडीखाली अडकून मृत्यू झाला होता. साक्षी दाभेकर ही चिमुरडी एका घरात दोन वर्षीय मुलीचा सांभाळ करीत होती. त्या घरावरही दरड कोसळली. त्यावेळी दोन वर्षांच्या मुलासह स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तिने खिडकीतून बाहेर उडी मारली. त्याचवेळी घराची भिंत साक्षीच्या पायावर पडली. भिंत पायावर पडूनही साक्षीने प्रसंगावधान दाखवित मुलाचा जीव वाचविला. या दुर्घटनेत तिचा उजवा पाय निकामी झाला.

त्यानंतर साक्षीवर मुंबई येथील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या बहादूरीची दखल घेत राज्य शासनासह, विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी, सामाजिक संस्थानी दिला मदतीचा हात दिला. दरड दुर्घटनेत साक्षी हिला अपंगत्व आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंगत्व प्रमाणपत्रासाठी तिने प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार आज जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांच्या हस्ते तिला अपंगत्वाचा दाखला देण्यात आला. यावेळी तिचे कुटूंबीय, डॉक्टर उपस्थित होते.

Exit mobile version