रायगड प्रीमियर लीग समितीकडून निवेदन
। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात हक्काचे मैदान मिळावे म्हणून रायगड प्रीमियर लीगच्या समितीने महाराष्ट्र शासनाकडे लेखी निवेदन देऊन जिल्ह्यात क्रिकेटच्या मैदानासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती. त्यावर रायगडचे महसूल तहसीलदार सचिन शेजाळ यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदारांना पत्रक काढून सर्व तालुक्यातील शासकीय जमिनीचा लँड बँक पुरविण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, त्यांच्याकडून निश्चित केलेल्या जागेची स्थळ पाहणी करून, मागणी केलेली शासकीय मिळकत ही निर्बंधरित्या वाटपास उपलब्ध असल्यास, शासन, महसूल व वन विभाग यांच्याकडील सूचना विचारात घेऊन त्यासोबतचे प्रपत्र भाग अ ते ड मधील प्रस्ताव, स्थळ पाहणी अहवाल, शासन, निर्णय, परिपत्रके, प्रचलित धोरणांनुसार त्यांचा स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव जिल्हा महसूल कार्यालयात सादर करावा, असे निर्देश सचिन शेजाळ यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यात गुणवान खेळाडूंसाठी क्रीडा स्पर्धांचे सुसज्ज आयोजन करता यावे यासाठी मैदानाची अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ठराविक ठिकाणीच मैदाने शिल्लक आहेत, तीसुद्धा काही मर्यादित काळासाठीच स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिली जातात. हक्काचे असे क्रीडांगण मिळावे म्हणून रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष राजेश पाटील, सचिव जयंत नाईक, अॅड. प्रथमेश पाटील, अॅड. कौस्तुभ पुनकर, उपाध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, आनंद घरत, संदीप जोशी, अॅड. पंकज पंडित, शंकर दळवी, सुरेंद्र भातिकरे, कौस्तुभ जोशी, जितेंद्र नाईक, सुबोध दरणे, सागर कांबळे यांच्यासह सर्व रायगड प्रीमियर लीगचे सदस्य, खेळाडू शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत.