कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

तहसील कार्यालयाबाहेर संतप्त नागरिकांच्या रांगा
ज्येष्ठ, महिला आणि दिव्यांगांचे हाल

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तहसीलदार कार्यालयातील अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा बसल्याचे चित्र मंगळवारी सकाळी पाहायला मिळाले. कार्यालय सुरू होण्याच्या वेळेपूर्वीच रेशनिंग विभागासह विविध शासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांनी कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मात्र, कार्यालयीन वेळ सुरू होऊनही अनेक कर्मचारी आणि अधिकारी अनुपस्थित असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे नागरिकांना तासन्‌‍तास प्रतीक्षा करावी लागली.

दूरवरून आलेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग यांना सकाळपासूनच उन्हात व उभ्या-उभ्याच प्रतीक्षा करावी लागली. शासनाने नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयीन वेळा निश्चित केल्या असताना, त्या वेळांचे पालन संबंधित अधिकारी आणि कर्मचारीच करत नसतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

दररोजच अशाच प्रकारे कार्यालयाबाहेर गर्दी आणि रांगा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. वेळेवर कर्मचारी उपलब्ध नसल्याने शासकीय कामांचा खोळंबा होत असून, नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. एका साध्या कामासाठी अनेक तास कार्यालयाबाहेर थांबण्याची वेळ येत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शिस्त आणि वेळेचे पालन करण्याचे नियम सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहेत का? अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही ते लागू होतात का? असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करून नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला.

पनवेलसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात तहसीलदार कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक विविध कामांसाठी येत असतात. अशा परिस्थितीत कार्यालयीन व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि कर्मचाऱ्यांची विलंबाने उपस्थिती ही गंभीर बाब असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, यासंदर्भात पनवेल तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Exit mobile version