माणगाव सत्र न्यायालयाचा निर्णय
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजे धोंडसे गावच्या हद्दीत दळवी फार्महाऊस येथे दरोड्याचा गुन्हा दि.15 मार्च 2016 रोजी सायंकाळी घडला होता. या गुन्ह्यात 1 कोटी 14 लाखांचा दरोडा टाकल्याप्रकरणी आरोपीना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माणगाव सत्र न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
या प्रकरणातील रमेश भिकमचंद परमार व इतर चार व्यापारी असून आरोपी विनोद विष्णू गुडेकर व इतर आठ या आरोपींपैकी हरीचंद्र गुडेकर याने सोन्याचे देवाणघेवाण करण्याचा व्यवहार करण्यासाठी सोन्याच्या बदल्यात रोख रक्कम देण्याचे ठरवले, यातील आरोपींनी आपसात कट रचून रमेश भिकमचंद परमार आणि साक्षीदार हे सोन्याच्या खरेदीसाठी आले .त्यावेळी आरोपींनी घातक शस्त्राने मारहाण करून त्यांना गंभीर व साध्या दुखापती करून पिस्तुलचा धाक दाखवून त्यांचे हातपाय रस्सीने बांधून त्यांच्याकडील रोख रक्कम 1 कोटी 14 लाख रुपये आणि सोन्याची चैन, हातातील घड्याळ व मोबाईल फोन गाड्यांच्या च्याव्या काढून घेऊन रूममध्ये बंद करून दरोडा टाकला होता.
गुन्ह्याचा तपास पाली पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी केला असून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले, सदर खटल्याची सुनावणी सत्र न्यायालय माणगाव येथे करण्यात आली. सदर खटल्यात सहायक सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे, सहायक शासकीय अभियोक्ता यांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासले व न्यायालयासमोर प्रभावीपणे युक्तिवाद केला. तसेच सदर कामकाजात पैरवी अधिकारी, यु एल धुमास्कर, छाया कोपनर, शशिकांत कासार, शशिकांत गोविलकर, सुनील गोळे, पो. शि सोमनाथ ढाकणे यांनी मदत केली. अभियोग पक्षाने कोर्टासमोर प्रभावीपणे केलेला युक्तिवाद आणि साक्षी पुराव्या वरून न्यायाधीश मा. एन एस कोल्हे, यांनी सदर घटनेतील गुन्ह्याचे आरोपी विष्णू गुडेकर व संतोष महाडिक यांस दोषी ठरवून 19 नोव्हेंबर 2021 रोजी भारतीय दंड विधान कलम 395 अन्वये 6 वर्ष सक्त मजुरी व रुपये पाच हजार दंड ठोठावण्यात आला आहे, तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. व उर्ववित आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.