महायुतीच्या विकृत राजकारणाला मूठमाती द्या : सपकाळ

| मुंबई | प्रतिनिधी |

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास करण्यात आले आहेत. बिहारमध्ये जंगलराज आहे असा आरोप करणाऱ्या भाजपा महायुतीचा महाराष्ट्रात नंगानाच सुरु असून, त्यांनी लोकशाहीला काळीमा फासला आहे. महायुतीच्या या गुंडगिरी, भ्रष्टाचार व विकृत राजकारणाला मूठमाती द्या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बीडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाने उच्छाद मांडला आहे, त्यांच्या गुंडगिरीने बीड जिल्ह्याचे नाव बदनाम झाले आहे, ही विकृत्ती आता थांबवली पाहिजे. काँग्रेस पक्ष या निवडणुकीत ताकदीने लढत आहे. तर महायुतीमधील पक्षच आपापसात लढत आहेत. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु असून जनतेमध्ये सत्ताधारी महायुतीविरोधात प्रचंड रोष आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसाठी उत्साह असून बीड सह मराठवाड्यातही काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली होईल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यावेळी माजी मंत्री अशोक पाटील, माजी आमदार व परभणी जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बीड जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनावणे, प्रदेश सचिव आदित्य पाटील, शहराध्यक्ष बहादूर भाई, तालुकाध्यक्ष प्रकाश मुंडे, प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते.

Exit mobile version