। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण केंद्रावर रात्रभर नागरिकांना रांगा लावून उपस्थित रहावे लागत आहे. तरी या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी रामदास शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रांवर तसेच इतर ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी उपलब्ध लसी प्रमाणे नागरिकांना लस दिली जाते. वास्तविक पाहता एकूण लोकसंख्या आणि मिळणारी लस यांच्या प्रमाणामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जात असले तरी त्या ठिकाणी शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे ते शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत लस देण्यास प्राधान्य देत आहेत. अल्प उत्पादन गट आणि सर्वसामान्य कुटुंबातील अनेक जण येथे रांगा लावून लस घेतात.लसीकरण केंद्रावर रात्री बारा वाजल्यापासून नागरिक रांगा लावत आहेत. अशीच परिस्थिती एकंदरीत पालिका क्षेत्रातील सर्वच केंद्रावर आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी हे नागरिक संपूर्ण रात्र रस्त्यावर जागून काढतात. लसींचा साठा वाढवण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा अशी न्याय मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आपल्याकडे करीत आहे.