मुद्देमाल जप्त; एकाला अटक
| कुडाळ | प्रतिनिधी |
निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत 3 तयार बंदुका, 6 बॅरल आणि बंदूक बनविण्याचे साहित्य असा एकूण 1 लाख 14 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय 65, रा. निरुखे सुतारवाडी) याला पोलिसांनी अटक केली.
निरुखे सुतारवाडी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैध अग्निशस्त्रे तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 27 एप्रिल रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास निरुखे येथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून 3 तयार अग्निशस्त्रे, बंदुकीचे 4 लाकडी बट, 6 लोखंडी बॅरल आणि शस्त्रे तयार करण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर व इतर साहित्य जप्त केले. याप्रकरणी संशयित जगन्नाथ मेस्त्री यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
