91 हजार रुपयांचा गुटखा जप्त
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन पोलीस ठाण्यामध्ये उमेश पाटील हे नव्याने पोलीस निरीक्षक म्हणून हजर झाले आहेत. पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दहा ते बारा दिवसांच्या कालावधीनंतर श्रीवर्धन पोलिसांनी तालुक्यात व शहरामध्ये गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास गुटखा पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कारसह अटक केली आहे. मात्र, अटक करण्यात आलेला गुटखा व्यापारी हा मूळ मालक नसून या सर्व छोट्या गुटखा विक्रेत्यांना गुटखा पुरवणारा म्हसळे येथील मोठा गुटखा माफिया अद्यापही रायगड पोलिसांना गुंगारा देत आहे.
श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सोमवारी (दि.4) शहरातील बुडण पाखडी परिसरामध्ये एकजण गुटखा विक्री करण्यासाठी आल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनंतर श्रीवर्धनच्या पोलिसांनी बुडण पाखडीत पहाणी केली. त्यावेळी त्यांना एका घराच्या परसावामध्ये चंदेरी रंगाच्या कारजवळ एक संशयास्पद व्यक्ती उभा असल्याचे निदर्शनास आले. त्याकडे चौकशी केली असता अगोदर त्याने उत्तर देण्यास नकार दिला. त्यानंतर कारची तपासणी केली असता, कारमध्ये विमल कंपनीच्या प्रतिबंधित गुटक्याच्या एकूण सहा बॅग मिळून आल्या. त्याची अंदाजे किंमत 91 हजार 520 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेला गुटखा आणि कार मिळुन एकूण 2 लाख 41 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात शोएब फारुख पटेल (27) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, श्रीवर्धनच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धन पोलीस अधिक तपास करीत आहेत.






