। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला मोठया संख्येने पदकं मिळवून देणार्या सर्व खेळाडूंना शेकापच्यावतीने लाल सलाम. मात्र या पदक विजेत्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील एकही खेळाडू नसावा, याची खंत वाटते. रायगड जिल्ह्याला क्रीडा सुविधा आणि साधने मुबलकपणे पुरविण्याकडे जर शासनाने गांभीर्याने लक्ष दिले तर भविष्यात पदक विजेत्यांमध्ये रायगड जिल्ह्यातले खेळाडू ऑलंपिकसारख्या खेळात तिरंगा फडकवताना पहायला मिळतील, असा विश्वास शेकापक्षाचे नेते माजी आ. पंडित पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारत देशाला पहिल्यांदाच एवढी पदकं मिळाली. पद मिळवणारी व्यक्ती गरीब कुटूंबातील आहेत. कोणाचे आईवडील मोलमजूरी करतात. धनाढ्य व्यक्तींची मुले मात्र ड्रग्जसारख्या व्यसनात पबमध्ये बुडालेले असतात. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंगा फडकवणारे गरीब कुटूंबातील खेळाडूच मोठया संख्येने होते. एखाद्या उद्योजक किंवा साखर कारखान्याच्या चेअरमनच्या मुलाने राष्ट्रकूल स्पर्धेत बक्षिस मिळवलेले दिसले नाही. अशा पदक विजेत्या आणि सहभाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना शेकापक्षाच्यावतीने आपण लाल सलाम करीत सांगत पंडित पाटील यांनी सर्व पदकविजेत्यांचे अभिनंदन केले.
ते पुढे म्हणाले की, रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकूल आज दयनीय अवस्थेत आहे. खेळाडूंसाठी लागणार्या आवश्यक गोष्टी, सुविधा यापैकी काहीच उपलब्ध नाहीत. या असुविधांकडे विद्यमान मुख्यमंत्री लक्ष देणार का, असा सवाल पाटील यांनी केला आहे. रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा आहे. तेथे जेएसडब्ल्यू, आरसीएफ, एचपीसीएल, रिलायन्स, गेलसारख्या कंपन्या असताना क्रीडा सुविधा पुरविण्याासाठी सरकारकडे पैसा नसेल तर या कंपन्यांकडे सीएसआरच्या माध्यमातून संकुलाची दुरुस्ती सोपवून का विकास केला जात नाही.
रायगड जिल्ह्यातील खेळाडू ऑलंपिकला कधी जाणार, असा सवाल करीत सरकार त्यासाठी काहीच करीत नसल्याची टिका देखील पाटील यांनी केली आहे. असा प्रयत्न कर्नाळा स्पोर्टस् कॉम्प्लॅक्सच्या माध्यमातून केला गेला. मात्र शासनाने याकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. आपण आमदार असताना या क्रीडा संकूलाचे मोठया थाटात उद्घाटन करण्यात आले. मात्र त्यानंतर त्याचा उपयोग क्रीडा उपक्रमाऐवजी मतमोजणी, कोव्हीड रुग्णालय यासाठीच केला गेला. मात्र मुळ उद्देश श्रमजीवी आणि कष्टकरी सर्वसामान्य जनतेला क्रीडा संकुलाचा लाभ मिळालाच नाही.
विविध उपक्रम मोठया प्रमाणावर राबविलेले गेलेले पहायला मिळाले नाही. असे असेल तर मग जिल्हा क्रीडा अधिकारी पद हवेच कशाला? असा सवालही त्यांनी यावेळी केला. रायगड जिल्ह्यात अनेक क्रीडांगण आहेत. मात्र त्याचा उपयोग योग्य हेतूसाठी होत नसल्याची खंतदेखील पंडीत पाटील यांनी व्यक्त केली. क्रीडा संकूल उभे झाले तेंव्हा जीएसटी कर प्रणाली नव्हती. मात्र आता राज्य सरकारकडे या करप्रणालीच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध आहे. मात्र या निधीचा विनीयोग योग्य प्रकारे होत नसल्याचा आरोप देखील पंडीत पाटील यांनी व्यक्त केला.