आरोपींच्या 12 तासांत मुसक्या आवळल्या; मोबाईल नंबरवरून लागला सुगावा
। म्हसळा । प्रतिनिधी ।
रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ येथे होळीच्या दिवशी झालेल्या खुनाचा उलगडा रायगड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत करीत या गुन्ह्यातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. संतोष साबळे, विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य अशी या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. होळींच्या दिवशी झालेल्या वादातून हा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
तोराडी बंडवाडी येथे काही दिवसांपूर्वी रस्त्यालगत मिळालेल्या गोणीतून दुर्गंधी येऊ लागला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याच्या संशयाने स्थानिकांनी याची माहिती म्हसळा पोलिसांना दिली. म्हसळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, गोणीमध्ये कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचे प्रेत आढळले. प्रेताची अवस्था पाहता त्याची ओळख पटवणे मुश्किल होते. प्रेताच्या खिशातील डायरीवर एकमेव नंबर लिहिलेला होता. हाच नंबर पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरला.
श्रीवर्धन तालुक्यातील कोंडे पंचतन येथील लेबर सप्लायर संतोष साबळे याचा हा फोन नंबर असल्याचे तपासात उलगडले. साबळे बांधकामासाठी कामगार पुरवण्याचे काम करतो. म्हसळा पोलिसांनी संतोष साबळे याला फोन करून बोलावून घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे म्हसळा पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर म्हसळा पोलिसांनी साबळेच्या म्हाप्रळ येथील साईटवरील कामगारांकडे चौकशी केली असता, होळीच्या दिवशी झालेल्या वादाची माहिती मिळाली. पोलिसांनी म्हाप्रळ येथून विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, आपणच होळीच्या दिवशी झालेल्या वादातून खून केल्याची कबुली दिली. खून केल्यानंतर दोघांनी याची माहिती साबळेला दिली. साबळेने प्रेत गोणीत भरून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत टाकण्याचा सल्ला दिल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. बादशहा असे मृत व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी याप्रकरणी संतोष साबळे, विशाल देवरुखकर आणि श्यामलाल मौर्य या तिघांना अटक केली. गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या 12 तासांत उलगडा करून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेवर एडवले त्यांचे सहकारी संतोष चव्हाण, सागर चितारे, विघ्ने, स्वप्नील निळेकर यांनी ही कामगिरी पार पाडली.