। रायगड । प्रतिनिधी ।
कोकणचा हापूस यंदा बाजारात कमी प्रमाणात दाखल होत असल्याने त्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत हापूस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत उत्पादन घटल्याने हापूसप्रेमींना त्यांच्या आवडत्या फळासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
हापूसची आवक आणि दरवाढीमुळे यंदाचा हंगाम कमी कालावधीत संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आंब्याचे चाहते लवकर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम आणि हापूसचा सुवास, मात्र यंदा हापूसप्रेमींना हा सुवास आणि चव महागात पडणार आहे. मागील वर्षी फेब्रुवारीपासूनच हापूसची भरघोस आवक सुरू झाली होती. यंदा पाऊस, थंडी आणि अवकाळी हवामान बदलामुळे 35 ते 40 टक्के उत्पादन घटले आहे. कोकणातून बाजारात येणार्या हापूसच्या संख्येत मोठी घट झाली आहे. पूर्वी फेब्रुवारीमध्ये दोन दिवसांआड मोठ्या प्रमाणात आंब्याच्या पेट्या येत होत्या, तर सध्या हा आकडा अवघा तीन ते साडेतीन हजार पेट्यांवर आला आहे. परिणामी, हापूसप्रेमी रायगडकरांना आपल्या खिशाचा विचार करूनच आंबा खरेदी करावा लागणार आहे.
सध्या बाजारात रत्नागिरी, देवगड, रायगड येथील हापूस दाखल झाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चार ते सहा डझनांच्या पेट्या तीन ते सहा हजार रुपये या दराने विकल्या जात आहेत. मागणी अधिक असल्याने एप्रिलनंतर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी प्रथम दर्जाच्या हापूससाठी ग्राहकांना आठ हजार रुपये प्रति पेटी इतका मोठा दर मोजावा लागत आहे. यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हापूसची चव चाखणे खर्चिक ठरत आहे.
उन्हाळ्यात प्रत्येक घरात हापूसची चव चाखण्याचा आनंद घेतला जातो. बाजारात हापूस दाखल होताच नागरिक आवडीने खरेदी करत आहेत; पण वाढीव दर पाहून काही ग्राहक प्रतीक्षा करण्याच्या मानसिकतेत आहेत. रायगडकरांनी हापूस घेण्यासाठी उशीर न करता लवकर खरेदी करावी, असा सल्ला व्यापारी देत आहेत.
यंदा हापूसच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने बाजारात पुरवठा कमी आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. मागणी मोठी असल्याने एप्रिलनंतर किमती आणखी वाढू शकतात. ग्राहकांची खरेदी करण्याची मानसिकता बदलली आहे. काहींनी लवकर खरेदी करणे पसंत केले आहे, तर काही प्रतीक्षा करत आहेत. हंगाम लवकर संपण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी वेळेवर खरेदी करावी.
महेश ठाकूर,
फळ विक्रेता.