| महाड | प्रतिनिधी |
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चवदार तळे सत्याग्रह दिनी रायगड पोलिसांकडून महाडमध्ये सशस्त्र मानवंदना दिली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे आदेश दिल्याची माहिती महाडचे आमदार भरत गोगावले यांनी दिली.
सत्याग्रहदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली होती. त्याचप्रमाणे आंबेडकरी जनतेतर्फेदेखील सातत्याने ही मागणी केली होती. आ. भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे या मागणीचा पाठपुरावा करुन ही मागणी मान्य करुन घेतली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी आंबेडकरी जनतेकडून केली जात होती. ती मागणी मान्य करुन घेण्यात आपल्याला यश आले याचा विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आ. भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.