नागेश कुलकर्णी
रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा, शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग-उरण विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांचा 13 सप्टेंबर रोजी वाढदिवस. यानिमित्ताने निर्भीड पत्रकार ते मंत्रीपदावर विराजमान झालेल्या रायगडच्या रणरागिणी असा त्यांचा आतापर्यंतच्या राजकीय जीवनप्रवासाचा मांडलेला हा धांडोळा. कृषीवलमध्ये 1980 च्या सालापासून अलिबाग प्रतिनिधी म्हणून मी अनेक वर्षे काम केले. तेव्हापासून आ. मीनाक्षीताई पाटील यांना जवळून ओळखता आले. त्यांनी कृषीवलमध्ये विविध विषयांवर विपुल प्रमाणात लिखाण केले आहे. याआधीचे कृषीवलचे तत्कालिन संपादक आणि रायगड जिल्ह्यातील श्रमजीवी जनतेचे नेते प्रभाकर पाटील यांच्याप्रमाणेच वेळोवेळी आमदार मीनाक्षीताईंचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याचमुळे मला रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघात गेली 40 वर्षे काम करण्याची संधी मिळाली. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघात सहचिटणीस, सरचिटणीस, खजिनदार आणि आता उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहे.
आमदार मीनाक्षीताई पाटील या रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित आहेत. पत्रकार संघाचे आतापर्यंत विष्णुभाऊ मंडलिक, नवीन सोष्टे असे अध्यक्ष झाले. सध्या सुप्रिया पाटील या विद्यमान अध्यक्षा आहेत. यातील प्रत्येक अध्यक्षांनी आपापल्या परीने पत्रकार संघाची व्याप्ती वाढविणे, पत्रकारांना न्याय मिळवून देणे, विविध उपक्रम राबविणे, विविध लोकोपयोगी कामांचा पाठपुरावा केला. एवढेच नव्हे तर, आपल्या कर्तबगारीचा वेगळा ठसा उमटविला आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे आमदार मीनाक्षीताई पाटील यांनी 1975 साली हाती घेतली आणि आपल्या कारकीर्दीत पहिला पत्रकार दिन साजरा केला, तो अलिबाग तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या वाघोडे गावाच्या आदिवासीवाडीत. त्यानंतर दुसरा पत्रकार दिन कोलाड वरसगावमध्ये. जनविकासाची कामे समजावून घेणे, त्यात असलेले दोष वा त्रुटी प्रकाशात आणून त्याकडे शासनाचे लक्ष वेधणे, हा त्या पाठीमागचा उद्देश होता.
पुढे कनकेश्वर येथेही पत्रकार दिनाचा कार्यक्रम पार पडला. नंतर रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर मात्र रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रामनारायण पत्रकार भवनात दरवर्षी सातत्याने पत्रकार दिनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास आतापर्यंत अनेक मान्यवरांना प्रमुख पाहुणे, महनीय वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश आहे. आमदार मीनाक्षीताई पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सहकार, आदिवासींचे सामूहिक विवाह, सीमालढ्यात सहभाग, छत्रपती शिवाजी महाराज त्रितशताब्दी पुण्यतिथी विशेषांकाचे रायगडावर प्रकाशन, श्रीमंत रमाबाई पेशवे यांनी हरिहरेश्वर येथे सुरू केलेला सनई चौघडा मध्यंतरी एक वर्ष बंद पडला होता. तो पत्रकार संघाने पूर्ववत सुरू केला. जनसंपर्क सभा, जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील कामगारांचे प्रश्न सोडविणे, कुष्ठरोग निवारण कार्यात हातभार, तसेच इतर उपक्रम राबवून पत्रकार संघाने रायगड जिल्ह्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. हे सारे उपक्रम राबविण्याच्या कामी मीनाक्षी पाटील यांचा पुढाकार होता. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आमदार मीनाक्षी पाटील यांनी ‘कुलाबा समाचार’चे संपादक रामभाऊ मंडलिक आणि ‘कृषीवल’चे संस्थापक नारायण नागू तथा आप्पासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ रामनारायण पत्रकार भवन बांधण्याचा संकल्प सोडला होता. याकामी स्व. प्रभाकर पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. खरे म्हणजे, पत्रकार भवन उभे राहावे, ही प्रभाकर पाटील यांची इच्छा होती.
पत्रकारांवर अन्याय करणार्या बिहार प्रेस विधेयकाच्या विरोधात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने उभारलेल्या आंदोलनात आमदार मीनाक्षी पाटील या सहभागी झाल्या होत्या. 13 सप्टेंबर 1982 रोजी पत्रकार परिषदेच्या वतीने सोलापूर येथे बिहार सरकारच्या विरोधात वृत्तपत्र विधेयकाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी बंदीहुकूम मोडल्याच्या आरोपावरून महाराष्ट्राच्या 84 पत्रकारांना शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यात आमदार मीनाक्षी पाटील या एकमेव महिला पत्रकार होत्या. त्यांना औरंगाबाद येथील तुरूंगात ठेवण्यात आले होते. त्यावेळी मीनाक्षी पाटील यांनी रणरागिणीप्रमाणे जो आक्रमक बाणा दाखविला, तो अद्वितीय स्वरूपाचा होता. मीनाक्षी पाटील या शेतकर्यांचे नेते नारायण नागू पाटील यांच्या नात आणि ज्येष्ठ नेते प्रभाकर पाटील यांच्या कन्या, त्यामुळे त्या अगदी लहानपणापासून राजकारणाकडे ओढल्या गेल्या. शेतकरी कामगार पक्षाचे काम करू लागल्या, निरनिराळे मोर्चे, सभा, निवडणुका यात त्यांचा सहभाग लहानपणापासून होता.
विशेष म्हणजे, 1982 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या उरण शेतकरी आंदोलनात त्यांचा प्रमुख सहभाग होता आणि या आंदोलनात त्यांना अटक होऊन दहा दिवस नाशिक जेलमध्ये ठेवले होते. वाचन, चिंतन, मनन, अमोघ वक्तृत्वशैली, सामान्य माणसाविषयीची कणव, डाव्या विचारसरणीचा अंगिकार, इतरांना वेळोवेळी मदत करणे, उक्ती आणि कृतीचा समन्वय साधणे, विविध क्षेत्रात काम करीत असताना आपल्या कर्तबगारीचा वेगळा ठसा उमटविणे, हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. आजही त्याचे प्रत्यंतर येते. पत्रकारितेबरोबरच मीनाक्षी पाटील यांनी आंबेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच, रायगड जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या, भू-विकास बँकेच्या संचालिका, रायगड बाजारच्या चेअरमन, पंतकृपा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, महाराष्ट्र राज्य हौसिंग फेडरेशनच्या संचालिका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालिका, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीप्रमुख आदी पदांवर आजवर काम केले आहे. 1995 ते 1999 मध्ये त्या अलिबाग उरण विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आल्या. विधानसभेतदेखील त्यांनी आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला. अलिबाग-उरण विधानसभा मतदारसंघच नव्हे तर, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न त्यांनी मांडले. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून त्याच्याच भोवती कामाचा डोंगर उभा करणार्या झुंजार नेत्या म्हणून त्या सर्वपरिचित आहेत. विश्रांती हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. कामाचा ध्यास हा त्यांचा स्थायीभाव आहे. अशा या रणरागिणीला दीर्घायुष्य लाभो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना