उष्माघाताचा वाढता धोका; थंड पेयांसह गॉगल, मफलर, छत्रीचा वापर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात रात्री व सकाळी हवेत गारवा असला, तरीही दुपारी कडक ऊन लागत आहे. होळीनंतर हवेत उष्णता वाढल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्याचबरोबर उन्हामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली असून, उष्माघातसारखा आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी थंड पेय पिण्याबरोबरच चष्मा, गॉगल व मफलरचा वापर केला जात आहे.
जिल्ह्यामध्ये उन्हाळी वातावरण सुरु झाले आहे. सकाळी साडेदहा वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ऊन प्रचंड जाणवत आहे. उन्हामुळे जिल्ह्यातील नागरिकांना झळ पोहचू लागली आहे. जिल्हयात अलिबागसह अनेक भागात नेहमी 33 अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा ही जास्त तापमान आहे. तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने दुपारच्यावेळी घरातून बाहेर पडणेदेखील टाळले जात आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, मफलर व गॉगलचा वापर करावा. तसेच, उन्हामुळे चक्कर येण्याची भिती आहे. डोकेदुखीसारखे आजार देखील उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतत पाणी प्यावे. अशक्तपणा निर्माण झाल्यास तात्काळ नजीकच्या दवाखान्यात जाऊन तात्काळ उपचार करावेत, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
रुग्णालयात उभारणार उष्माघात केंद्र
रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालये आहेत. तसेच, जिल्हा परिषद अखत्यारित जिल्हा आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहेत. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र उभारण्याच्या सुचना जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आरक्षित खाटा, औषधे व कर्मचार्यांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
नारळ पाणीला पसंती
जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून ऊन प्रचंड जाणवत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी तसेच शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या प्रकराच्या उपाययोजना करीत आहेत. शरीराला पोषक असलेले नारळ पाणी बाजारात उपलब्ध झाले आहेत. 40 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत नारळ पाणी बाजारात विक्रीसाठी आहेत. या दुकानांमध्ये दुपारच्यावेळेला नारळ पाणी पिण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असताना, उसाचा रसही पिण्यावर नागरिक भर देत आहेत.
सध्या उष्ण वातावरण आहे. उष्माघाताचा धोका असल्याची भिती आहे. उन्हात बाहेर पडू नये. उन्हात जास्त काम करू नये. भरपुर पाणी प्यावे. चक्कर व अन्य काही लक्षणे आढळल्यास नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार घेणे.
डॉ. निशीकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग