| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आमंत्रितांच्या 14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत रायगड क्रिकेट असोसिएशन संघाने दुसऱ्या सामन्यात पश्चिम विभाग संघावर निर्णायक विजय मिळवला. रायगडाने हा सामना डाव व 50 धावांनी जिंकला. पंकज इटकर याने कर्णधाराला साजेसा खेळ करत 45 धावा आणि 11 बळी घेतले. पहिल्या सामन्यात 3 व दुसऱ्या सामन्यात 7 गुण असे रायगडचे दोन सामन्यात मिळून 10 गुण मिळवले. तिसरा सामना 31 डिसेंबरला विस्डोम संघाबरोबर आहे.
या सामन्यात रायगड संघाने प्रथम फलंदाजी करताना 57 षटकात 222 धावा केल्या. सुरुवातीला पडझडी नंतर साहिल पोपेटा 56, पंकज इरकर 45, अथर्व पाटील 32, आर्यन निकाळजे 29, वेदांत कडू 26 धावा यांनी धावसंख्या सर्व बाद 222 वर नेली. पश्चिम विभागाकडून आयुष रोटे याने 20 षटकात 4 बळी मिळवले. पश्चिम विभागाचा पहिला डाव 32 षटकात 75 धावांत संपला. पार्थ म्हात्रे याने 17 धावा केल्या. रायगडकडून अथर्व पाटील 15 धावत 5 बळी तर पंकज इटकर याने 12 धावात 4 बळी मिळवले. रायगडने पश्चिम विभागाला फॉलोऑन दिला. पश्चिम विभागाचा दुसरा डाव 35 षटकात सर्वबाद 97 वर आटोपला. आयुष रोटे याने 26 धावा केल्या. रायगडकडून कर्णधार पंकज इटकर याने 13 षटकात 28 धावा देत 7 बळी मिळवले. रायगड संघाने या सन्यात निर्णायक विजय मिळवला.