खालापूर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींना पुरस्कार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 4.0 अभियानात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. अभियानांतर्गत खालापूर तालुक्यातील वडगाव, तांबाटी, साजगाव ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून, कोकण विभागात सर्वोत्तम कामगिरीत रायगड जिल्हा परिषद अव्वल ठरली आहे.
भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या 5 घटकांवर आधारित ‘ माझी वसुंधरा अभियान 4.0’ हे अभियान 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2024 या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानात रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. माझी वसुंधरा अभियान 4.0 चे मूल्यमापन क्षेत्रीय मूल्यमापन समितीने प्रत्यक्ष भेटी देऊन केले व राज्य शासनाला अहवाल सादर केला होता.
माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये 5 ते 10 हजार लोकसंख्या असणार्या गटात खालापूर तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात सातवा क्रमांक मिळविल्याने ग्रामपंचायतीला 50 लाख रुपये बक्षीस प्राप्त होणार आहे. तर 2 हजार 500 ते 5 हजार लोकसंख्या असलेल्या गटात खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात 7 वा क्रमांक पटकाविला असून, साजगाव ग्रामपंचायतीने कोकण विभागात पहिला तर राज्यात 10 वा क्रमांक पटकाविला आहे. यामुळे तांबाटी ग्रामपंचायतीला 50 लाख तर साजगाव ग्रामपंचायतीला 15 लाख रुपये बक्षीस प्राप्त होणार आहे. अभियानाच्या सुरुवातीपासून रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, खालापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी संदीप कराड, माझी वसुंधरा उपक्रम कोकण विभाग तज्ञ अमोल पडळकर, पंचायत समिती अधिकारी यांनी ग्रामपंचायतींना मार्गदर्शन केले. संबंधित ग्रामपंचायतींंचे ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी यांनी ग्रपांचायात हद्दीत उपक्रम राबविण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याने हे यश प्राप्त झाले आहे.