पावस, नाचणे येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
कोकण किनारपट्टीलगत विस्तीर्ण कांदळवन पट्टयाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी पर्यटनाच्या नव्या संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी कोकणातील 15 किनारी गावांमध्ये पर्यटन झोन विकसित करण्यात येणार आहेत. यापैकी रत्नागिरी तालुक्यातील पावस आणि नाचणे येथे हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरूही करण्यात आला आहे. उर्वरित गावांतही या प्रकल्पाच्या कामांना वेग आला आहे. या गावातून पक्षी निरीक्षण, कांदळवन अभ्यास, कांदळवन नौका सफर आदींद्वारे पर्यटकांना आकर्षित करताना स्थानिकांना पर्यटनाद्वारे उपजीविकेचे साधन निर्माण करण्यात येणार आहे.
कांदळवन कक्ष, वन विभाग महाराष्ट्र राज्य व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या सहाय्याने कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनेंतर्गत कोकणातील किनारी गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतर्फे किनारी गावातील खाडीक्षेत्रात दुर्लक्षित असलेले कांदळवन पर्यटन झोन विकसित करण्यात येणार आहे. रत्नागिरी तालुक्यात नाचणे येथील काजळी आणि गौतमी नदीच्या खाडी क्षेत्रात हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू झाला आहे. या प्रकल्पाद्वारे पक्षी निरीक्षण, कांदळवन अभ्यास फेरी, कांदळवन नौका सफर याद्वारे कांदळवनाचे संरक्षण व संवर्धनाबाबत माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. तसेच, कांदळनाच्या जाती प्रजाती, त्यांची उपयुक्तता याबाबत अभ्यास करणार्या अभ्यासकांना या क्षेत्रात संशोधन करता करण्याचे व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कांदळवन निसर्ग पर्यटनाअंतर्गत कांदळवन आणि सागरी जैवविविधता परिचय केंद्र असे अनेक उपक्रम येथे राबविण्यात येणार आहेत. पर्यटन झोनमध्ये भेट देणार्यांसाठी कांदळवनात बोटीतून सफर, निसर्ग भटकंती, कांदळवन पक्षी निरीक्षण, बेटावरील निवास अशा अनेक उपक्रमांनी पर्यटकांना या नव्या दालनांकडे आकर्षित करण्यात येणार आहे. कोकणातील पालघर जिल्ह्यातील चार गावे, रायगडातील चार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच आणि रत्नागिरी जिल्ह्यातील दोन गांवाचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, ठाणे जिल्हा, नवी मुंबई आणि मुंबईतही या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
राखीव कांदळवन क्षेत्र
कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि मुंबईतील अंधेरी, बोरिवली जिल्ह्यातील 1,575 हेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव क्षेत्र म्हणून घोषित केले होते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 374.5 हेक्टर, रायगड 392, बोरिवलीतील 182.9, अंधेरीतील 70 हेक्टर आणि ठाण्यातील 554.7 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्राला राखीव क्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या क्षेत्रात पर्यटनाच्या माध्यमातून उपजीविकेची साधने निर्माण करताना कांदळवन पर्यटन क्षेत्राची निर्मिती करण्यात येणार आहे.