सिद्धेश वीरची अष्टपैलू खेळी
। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्यावतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत अकराव्या दिवशी पहिल्या लढतीत सिद्धेश वीर (61 व 1/19) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने छत्रपती संभाजी किंग्स संघाचा 3 गडी राखून पराभव करत तिसरा विजय मिळवला.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओम भोसले व मुर्तझा ट्रंकवाला या सलामीच्या जोडीने 32 चेंडूत 53 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. ओम भोसलेने 48चेंडूत नाबाद 81धावांची आक्रमक खेळी केली. त्यात त्याने 11चौकार व 1षटकार मारले. त्याला मुर्तझा ट्रंकवालाने 39 चेंडूत 4 चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 44धावांची खेळी करून साथ दिली.
मुर्तझा ट्रंकवालाची झंझावती खेळी सिद्धेश वीरने झेल बाद करून संपुष्टात आणली. त्यानंतर, मात्र रायगड रॉयल्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत छत्रपती संभाजी किंग्सच्या फलंदाजांना झटपट तंबूत पाठवले. ओमकार खाटपे (1), दिग्विजय पाटील (3), दिग्विजय जाधव (8), सौरभ सिंग (1), शामसुझमा काझी (2), स्वराज चव्हाण (2), आनंद ठेंगे (0) हे झटपट बाद झाले. रायगड रॉयल्सकडून सुनील यादव (3-24), सिद्धेश वीर (1-19), विकी ओस्तवाल (1-15) यांनी सुरेख गोलंदाजी करून छत्रपती संभाजी किंग्स संघाला 146धावावर रोखले.
146 धावांचा पाठलाग करताना रायगड रॉयल्स संघाने 19.4 षटकात 7 बाद 147 धावा करून पूर्ण केले. सलामीचा फलंदाज सिद्धेश वीरने 53 चेंडूत 3चौकार, 3 षटकार मारत 61 धावांची खेळी केली. प्रणय सिंगने स्पर्धेतील महागडा खेळाडू ठरलेल्या नौशाद शेखला 11 धावांवर त्रिफळा बाद केले. त्यानंतर सिद्धेश वीरने मेहुल पटेलच्या समवेत तिसर्या विकेटसाठी 45चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. मेहुल पटेलने 35 चेंडूत 42 धावा केल्या. यात त्याने 3 चौकार व 1 षटकार मारला. त्यानंतर ऋषभ राठोडने 20 धावा काढून संघाचा विजय सुकर केला.