रायगडचा नंदुरबारवर विजय

Cricket wickets,ball and bat

नैतिक सोळंकीचे सामन्यात 13 बळी; स्मित पाटीलचे आक्रमक शतक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुणे येथे सुरू असलेल्या सोळा वर्षांखालील मुलांच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत रायगडने नंदुरबारवर डाव आणि 194 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात रायगडच्या नैतिक सोळंकीने दोन्ही डावात मिळून 13 बळी घेतले. तर, स्मित पाटीलने आक्रमक शतक (111 धावा) झळकावले. नाणेफेक जिंकून नंदुरबार संघाने फलंदाजी स्वीकारली. त्यांचा पहिला डाव 154 धावात संपला. लेगस्पिनर नैतिक सोळंकीने 14 षटकांत 38 धावा देत 6 बळी घेतले. शुभम पाटील याने 2 बळी घेतले. तर, अमेय पाटील व सर्वेश ऊलवेकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. रायगडने आपला पहिला डाव 7 बाद 413 या धावसंखेवर घोषित केला. पहिल्या डावात रायगडला 259 धावांची भक्कम आघाडी मिळाली. नंदुरबार संघाचा दुसरा डाव केवळ 27.4 षटकांत 65 धावात आटोपला.


रायगडच्या स्मित पाटीलने आक्रमक फलंदाजी करून शतक झळकावले. त्याने 106 चेंडूंचा सामना करून 111 धावा केल्या. ओम म्हात्रे (78 धावा), सर्वेश ऊलवेकर (38), अमित शर्मा (51), क्रिश पाटील (43 ) यांनी चांगली फलंदाजी केली. नंदुरबार संघाच्या दुसर्‍या डावातदेखील नैतिक सोळंकीने 13 षटकांत 10 धावा देत 7 बळी घेतले. त्याने एका षटकात तीन बळी टिपले. अमय पाटीलने दोन बळी व राहुल सिंग याने एक बळी मिळवत त्याला चांगली साथ दिली. रायगड संघाचे व्यवस्थापक प्रशिक्षक जॉन्टी गिलबिले यांनी खेळाडूंकडून चांगली कामगिरी करून घेतली. रायगड संघाचे रायगडमधील क्रिकेटप्रेमींकडून कौतुक होत आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते आणि सर्व सभासदांनी संघाचे अभिनंदन केले.

Exit mobile version