रेल्वेचे फाटक चार दिवस बंद

नेरळकरांची होणार गैरसोय

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेचे मेन लाईनवरील नेरळ येथे असलेले फाटक हे दुरुस्तीच्या कामासाठी 26 सप्टेंबरपासून 30 सप्टेंबर या कालावधीत बंद ठेवले जाणार आहे. परिणामी, नेरळ पूर्व आणि पश्‍चिम भागातील स्थानिक रहिवाशांचे हाल होणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, अशी सूचना मध्य रेल्वे आणि नेरळ ग्रामपंचायतीने केली आहे.

मध्य रेल्वे वर नेरळ हे जंक्शन स्थानक आहे. या स्थानकात मेन लाईनवरील 86 किलोमीटर अंतर येथे मध्य रेल्वेचे फाटक क्रमांक 21 आहे. त्या ठिकाणी नेरळ पूर्व आणि पश्‍चिम भाग जोडणारा भाग असल्याने वाहनांच्या रांगा सतत लागलेल्या असतात. त्यामुळे या फाटकाचा पृष्ठभाग हा कायम नादुरुस्त होत असतो. त्यात त्या ठिकाणी मुंबई-पुणे मेन लाईनवरील गाड्यांची वाहतूक सतत सुरू असते, तसेच उपनगरीय लोकल गाड्यांची वाहतूक सुरू असते. तर, रस्ते मार्गाने जाणार्‍या गाड्यांची तसेच अवजड वाहनांची वाहतूकदेखील सतत सुरू असते. त्यामुळे या फाटकात सतत दुरुस्तीची कामे मध्य रेल्वेच्या वतीने करावी लागतात.

मध्य रेल्वेकडून दुरुस्तीची कामे करण्यासाठी 26 सप्टेंबर सकाळ पासून 30 सप्टेंबर दुपार बारा पर्यंत फाटक मधून रस्ते मार्गाने होणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.त्याचा परिणाम शाळा कॉलेज यांच्या बसेस यांना मोठा त्रास होणार आहे. सलग चार दिवस फाटक बंद ठेवणे स्थानिकांसाठी प्रचंड त्रासदायक ठरणार आहे. हे फाटक बंद ठेवले जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे नेरळ स्थानक आणि नेरळ ग्रामपंचायतीचे वतीने देण्यात आली आहे. मात्र फाटक बंद असल्याने नेरळ गावातील रहिवाशी यांना पलीकडील बाजूस जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. या पर्यायी मार्गासाठी सात ते आठ किलोमीटर अंतर अधिक जावे लागणार आहे.

Exit mobile version