। अलिबाग । प्रतिनिधी ।
नव्याने येणार्या सिनारमन्स प्रकल्पाला भूसंपादनापूर्वीच पाणी दिले जात आहे. राज्याच्या उद्योग विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांचे म्हणणे असल्याची माहिती समोर येत आहे. उद्योग विभागाचा डाव कधीही यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे गटातील राजा केणी यांनीच सरकारविरोधात दंड थोपटून उद्योगमंत्री उदय सामंत यांना घरचा आहेर दिला आहे. विद्यमान आमदार दळवी यांना विचारात न घेता हा प्रकार परस्पर केल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उधाण आले आहे.
अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे. या कारखान्यासाठी अद्याप भूसंपादन पूर्ण झालेले नसताना पाण्याची पाइपलाइन टाकण्यासाठी 356 कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, ज्या शेतकर्यांच्या जमिनीतून पाइपलाइन जाणार आहे, त्या शेतकर्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आले नाही.
राज्यात भाजप, शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादी यांचे महायुतीचे सरकार आहे. शिंदे गटातील शिवसेनेचे नेते रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. उद्योग मंत्रालयाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केणी यांनी केला आहे. कुर्डुस, कुसुंबळे, श्रीगाव परिसरातील शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सत्ताधारी गटातील ‘राजा’ने सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. सरकारच्या मित्रपक्षातील स्थानिक आमदार आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांना हा घराचा आहेर समजण्यात येत आहे.
गेली दहा वर्षे आपणाकडे कुर्डुस, कसुंबळे, श्रीगाव या ग्रामपंचायत हद्दीतील 28 गावांना फिल्टर पाण्याची लाईन देण्यासाठी वारंवार लेखी व प्रत्यक्ष भेटून मागणी करूनही कारवाई शून्य आहे. आजतागायत एमआयडीसीने कोणतीही कारवाई केली नाही. 1982 साली स्वतःची पिकती जमीन शेतकर्यांनी एमआयडीसीला कवडीमोल भाडे तत्त्वावर दिली आहे. त्या जागेचे सर्व अधिकार शेतकर्यांकडे राहतील या कराराप्रमाणे गेल्या 43 वर्षांपूर्वी केलेल्या कराराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. 1997 साली तत्कालीन निपॉन कंपनी आणि सध्याची जेएसडब्ल्यू कंपनीची पाण्याची पाईपलाईन शेतकर्यांना कोणताही मोबदला न देता एमआयडीसीने शेतकर्यांची जमीन परस्पर जेएसडब्ल्यू कंपनीला भाडे तत्त्वावर देऊन शेतकर्यांची घोर फसवणूक केली आहे, असे राजा केणी यांचे म्हणणे आहे.
सरकारकडून शेतकर्यांना विश्वासात न घेता ही प्रक्रिया सरकारकडून राबविली जात आहे. मात्र, त्याच सत्तेतील पुढार्यांकडून शेतकर्यांच्या बाजूने येऊन गोंजरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे अधिकार्यांना दम देण्यापेक्षा सत्तेत असलेल्या त्या विभागाच्या मंत्र्यांकडून शेतकर्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, अशी चर्चा जोरात सुरु आहे. राजा केणी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटात सर्वकाही अलबेल नसून, अंतर्गत वाद असल्याचे बोलले जात आहे.
केणी पक्ष बदलण्याच्या मार्गावर नाहीत ना?
शिंदे गटातील राजा केणी हे आमदार दळवी यांचे समर्थक आहेत. राजा केणी यांनी आपल्या सोयीनुसार अनेक पक्ष बदलले आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी या पक्षाचे ते काम करीत होते. त्यानंतर त्यांनी तटकरे यांना रामराम करीत आता शिंदे गटात कार्यरत आहेत. आमदार दळवींच्या आदेशानुसार ते पक्षाचे काम करीत आले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दळवींना विश्वासात न घेता आपल्या मर्जीने काम करीत असल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे केणी पक्ष बदलण्याच्या मार्गावर नाहीत ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.