शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबाचे सांत्वन
| भाकरवड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील भाकरवड गावच्या रहिवासी तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या व माजी ग्रामपंचायत सदस्या स्वर्गीय रजनी रमेश पाटील यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भाकरवड परिसरात शोककळा पसरली आहे.
रजनी पाटील या अत्यंत शांत, मितभाषी, प्रेमळ आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होत्या. ग्रामपंचायत पोयनाडच्या निवडणुकीत त्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून आल्या होत्या. ग्रामविकास आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले होते.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी रजनी पाटील यांच्या सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत श्रद्धांजली अर्पण केली.
रजनी पाटील यांच्यावर भाकरवड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक आणि शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पार्थिवावर भाकरवड ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शंकर बाळू पाटील, दिलीप पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
त्यांचे उत्तरकार्य (दहावा) गुरुवार, दि. २ जुलै रोजी ओंकारेश्वर मंदिर, दिवलांग येथे होणार असून तेरावा रविवार, दि. ५ जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ह.भ.प. शेळके महाराज, सांबरी यांचे प्रवचनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुलगे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबासह भाकरवड परिसरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.






