चिंध्रण येथील ग्रामस्थांच्या उपोषणाचा गुरुवारी चौथा दिवस ; अद्याप अधिकारी फिरकलेच नाहीत
| पनवेल | प्रतिनिधी |
सोमवारी 28 ऑगस्ट रोजी चिंध्रण येथील ग्रामस्थांनी मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या बळजबरी उभ्या केलेल्या टॉवरविरोधात आमरण उपोषण सुरू करून आज चौथा दिवस उजाडला. मात्र, अद्यापही या उपोषणकर्त्यांची साधी विचारपूस करण्यासाठी तालुकास्तरावरील किंवा जिल्हास्तरावरील अधिकारी फिरकलेच नाहीत. त्यातच बुधवारी रक्षाबंधनाचा सणदेखील उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांचा हा उपोषण ठिकाणीच पार पडला.
रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी बहिणी आल्या, मात्र आपले भाऊ घरातच नाहीत. ज्या भावाला गोडधोड खाऊ घालण्यासाठी बहिणी आल्या, त्या उपोषणाच्या ठिकाणीच त्यांना राखी बांधून उपाशीच ठेवून गेल्या. प्रशासनाचा नाकर्तेपणा यावेळी भावा बहिणींच्या अश्रुंमधून झळकत होता. यावेळी उपोषणकर्ते किरण कडू, सुजित पाटील, मनोज कुंभारकर, राम पाटील, विलास पाटील, मधुकर पाटील, शैलेश अरीवले, जयराम कडू, रुपेश मुंबईकर, बामा भंडारी, गणेश देशेकर, संतोष अरीवले, ताईबाई कडू, समीर पारधी यांनी उपोषणादरम्यान कोणाच्या जीवाचे काही बरे-वाईट झाले तर शासनाला जबाबदार ठरवले आहे.
याठिकाणी उपोषणाचा चौथा दिवस उजाडला तरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मुंबई ऊर्जा प्रकलपासाठी जी नियोजित जागा होती, त्याच जागेतून टॉवर नेण्यात यावेत, मात्र मुंबई ऊर्जा प्रकल्पाच्या मालकाने सबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून ग्रामस्थांच्या जागा बळकाविल्या आहेत, असा आरोपदेखील यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.