बॅडमिंटन कोर्टमुळे उदयोन्मुख खेळाडूंमध्ये आशेचा किरण
| अलिबाग | प्रतिनिधी |
सचिनमुळे लहान मुले क्रिकेट खेळू लागली, सायना नेहवालमुळे मुली हातपाय मारायला लागल्या, त्याचप्रमाणे महेश भूपती, लिएंडर पेस, रोहन बोपण्णा, सानिया मिर्झा यांच्याकडे बघत आज असंख्य मुले-मुली टेनिसकडे वळत आहेत. या सर्व खेळाडूंनी आपापली कारकीर्द गाजवली असून, देशाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांचे अनुकरण करीत तालुक्यातील बांधणच्या भूमीत उद्याचे वारसदार घडतील, अशी आशा आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जिल्हा महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने बॅडमिंटन कोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानिमित्त उदयोन्मुख खेळाडू, प्रशिक्षकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना सरावासाठी बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध नसल्याने पनवेल अथवा आरसीएफमधील क्रीडा संकुलात जाण्याची वेळ येत होती. खेळाडूंची होणारी गैरसोय चित्रलेखा पाटील यांनी दूर करण्याचा ‘पण’ केला होता. त्याची फलनिष्पत्ती आज झाल्यामुळे खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या कार्टमुळे खेळाडूंना नवा आशेचे किरण प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया खेळाडूंनी व्यक्त केल्या.
बॅडमिंटन कोर्ट हे मोठ्या शहरामध्ये जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी तयार केले जाते. शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबागजवळील बांधण येथील एका लहानशा गावात ऑलिम्पिक धर्तीवर सुसज्ज असे बॅडमिंटन कोर्ट निर्माण करण्यासाठी घेतलेला धाडसी निर्णय आहे. येथील लोकांच्या हिताचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पूर्वी खेळाडूंना अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म नव्हते. आता हे प्लॅटफॉर्म मिळाल्याने येथील खेळाडूंना सरावासाठी उपयोगी ठरणार आहे.
ॲड. जुनेद घट्टे, प्रशिक्षक
अलिबाग तालुक्यातील आंबेपूर परिसरात बॅडमिंटन कोर्ट बांधण्यात आले आहे. या कोर्टचा खेळाडूंना चांगला फायदा होणार आहे. बॅडमिंटन कोर्टमधून असंख्य खेळाडू तयार होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील हे बॅडमिंटन कोर्ट आहे. यातून अनेक खेळाडूंना व्यासपीठ मिळणार आहे.
शुभम पाटील, प्रशिक्षक
गेल्या अनेक वर्षांपासून बॅडमिंटन खेळ खेळत आहे. अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील रहिवासी आहे. बॅडमिंटन खेळाडूंना सराव करण्यासाठी शेकापकडून एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. खेळाडूंना चांगली संधी यातून उपलब्ध झाली आहे. प्रशिक्षकांच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार होणार आहेत.
प्रसाद सिदूसरे, खेळाडू
गेल्या सहा वर्षांपासून थ्रो बॉल खेळ प्रकार खेळत आहे. राष्ट्रीय पातळीपर्यंत कामगिरी बजावली असून, सुवर्णपदक मिळविले आहेत. सध्या मी पनवेलध्ये एम.कॉमचे शिक्षण घेत आहे. रायगड जिल्ह्यातील वातावरण खेळासाठी पोषक आहे. याठिकाणी वेगवेगळ्या खेळासाठी अधिक चांगल्या पद्धतीने क्रीडा संकुल उभे होणे काळाची गरज आहे. बांधण येथे उभारलेले बॅडमिंटन कोर्ट खेळाडूंसाठी एक वरदान ठरणार आहे. खूप चांगले व्यासपीठ शेकापने मिळवून दिले आहे.
अभिराज म्हात्रे, पेझारी (खेळाडू)
गेल्या तीन वर्षांपासून रायफल शूटिंग हा क्रीडा प्रकार खेळत आहे. आतापर्यंत राज्य पातळीवर या खेळातून कामगिरी बजावली आहे. माझे मूळ गाव कमळपाडा आहे. सध्या अलिबागमध्ये राहते. बांधण या ठिकाणी बांधण्यात आलेल्या बॅडमिंटन कोर्टमुळे खेळाडूंसाठी एक पर्वणी मिळाली आहे. या कोर्टमधून अनेक खेळाडू घडण्यास मदत होणार आहे. एका ग्रामीण भागात अशा प्रकारचे कोर्ट उभारून खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.
देवश्री टेमकर, कमळपाडा (खेळाडू)