आपच्या खासदाराच्या घरावर हल्ला
अयोध्या | वृत्तसंस्था |
अयोध्येत जमीन खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. संजय सिंग यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. यावेळी संजय सिंग यांनी भाजपाला जाहीर आव्हान देत कितीही गुंडगिरी केली तरी मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही असं म्हटलं आहे. संजय सिंग यांनी ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत 18.5 कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंग यांनी केली आहे.
संजय सिंग यांच्या आरोपांनंतर देशभरात खळबळ माजली असून याचवेळी त्यांच्या घऱावर हल्ला झाला आहे. संजय सिंग यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माझ्या घरावर हल्ला झाला आहे. भाजपावाल्यांना कान उघडे ठेवून ऐकावं, कितीही गुंडगिरी केली तरी प्रभू श्रीरामाच्या नावे बनणार्या मंदिराचा पैसा चोरी होऊ देणार नाही. त्यासाठी माझी हत्या झाली तरी बेहत्तर.पण मी कुणालाही रामजन्मभूमीचा एक पैसाही खाऊन देणार नाही,असे त्यांनी ठणकावून सांगितले.