प्लॉटिंग आणि बंगले उभारणीसाठी झाडांची कत्तल; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात विकासकामांच्या नावाखाली जमीन सपाटीकरण, प्लॉटिंग आणि बंगले उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक वर्षे जुनी आणि मोठी झालेली झाडे तोडली जात असल्याने पर्यावरणप्रेमींसह स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
तालुक्यात विविध ठिकाणी जमीन सपाटीकरणाची कामे सुरू असून, या कामांसाठी ऐन, खैर, साग यांसारख्या मौल्यवान वृक्षांची तोड केली जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, संबंधित प्रकरणांमध्ये वन विभागाकडून केवळ अनधिकृत वृक्षतोडीच्या अनुषंगाने कारवाई होताना दिसत असल्याने या कारवाईच्या पद्धतीबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची वन विभागाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सुधागड तालुक्यात वाढत्या जमीन विकासकामांमुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता आहे. जंगल आणि वृक्षसंपदा कमी झाल्यास भविष्यात पाण्याची उपलब्धता, जैवविविधता आणि स्थानिक पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सुधागड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जमीन सपाटीकरण, प्लॉटिंग व बांधकामांसाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्ती तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.







