| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
दीपावली आणि रांगोळी यांचे एक अतूट नाते आहे. दीपावलीच्या सणात घरासमोर रंगीबेरंगी रांगोळी काढून आनंदाचे आणि पवित्रतेचे स्वागत केले जाते. मात्र, यंदा पनवेलमधील नवोदित रांगोळी कलाकारांनी आपल्या कल्पकतेला सामाजिक भानाची जोड देत रांगोळीच्या माध्यमातून विविध विषयांना वाचा फोडली आहे.
रांगोळी म्हणजे केवळ रंगांची कलाकुसर नसून समाजातील घडामोडी मांडण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे या कलाकारांनी दाखवून दिले आहे. वृक्षतोड, कोकणातील जंगलांचे संवर्धन, पाणीटंचाई, देशप्रेम, तसेच कला आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे अशा विविध विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत.
रंगदीप क्रिएशनच्या माध्यमातून कलाकारांनी वेगवेगळ्या संकल्पना रंगांच्या माध्यमातून जिवंत केल्या आहेत. कीर्ती घरत यांनी ‘सेव्ह भीमाशंकर ॲड कोकण फॉरेस्ट’ ही संकल्पना मांडत जंगल संवर्धनाचा संदेश दिला. नेहा घरत यांनी पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न रांगोळीतून मांडला. प्रकाश नवलें यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे व्यक्तिचित्र साकारले. कशिश टिके यांनी बासरी वाजविणाऱ्या राधेची सुंदर प्रतिमा रंगवली. नाथुराम भेंडखळे यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांचे व्यक्तिचित्र साकारले, तर मनोज भोपी यांनी अभिनेते नाना पाटेकर यांची प्रतिमा रांगोळीतून जिवंत केली. रितुपर्णा किरतोनिया यांनी भगवान विष्णूंची आकर्षक रांगोळी साकारली.
विशेष म्हणजे, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांपासून ते देशप्रेम आणि पर्यावरण संवर्धनापर्यंत विविध विषय कलाकारांच्या कल्पकतेतून समोर आले आहेत. केवळ सणापुरती रांगोळी न काढता समाजातील प्रश्नांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न या कलाकारांनी केला आहे. रंगांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या या रांगोळ्यांनी पनवेलकरांचे लक्ष वेधून घेतले असून, दीपावलीच्या उत्सवाला कलात्मकतेची आणि सामाजिक जाणिवेची वेगळी किनार लाभली आहे.
सांस्कृतिक विषयातून साकारली रांगोळी
