लज्जास्पद! अल्पवयीन विवाहितेवर 400 जणांकडून बलात्कार

आरोपींमध्ये चक्क पोलिसाचाही समावेश
। बीड । प्रतिनिधी ।
आज देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली. तरीही महिलांना स्वातंत्र्य मिळाले नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. आजही आपल्या देशातील महिला असुरक्षित आयुष्य जगत आहेत. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात घडलेल्या बलात्कारामुळे पुन्हा मुद्दा अधोरेखित झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत 16 वर्षांच्या विवाहितेवर तब्बल 400 लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. पीडितेने तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केल्यावर एका पोलिसाने देखील तिचे लैंगिक शोषण केले. ही पीडिता आता दोन महिन्यांची गरोदर आहे.

पीडित मुलीच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी आठ महिन्यांपूर्वी तिचे लग्न लावून दिले. मात्र, पती आणि सासरच्या मंडळींनी तिला मारहाण आणि वाईट वागणूक देत तिचा छळ केला. त्यामुळे ती पळून गेली आणि वडिलांकडे राहायला आली. मात्र वडिलांनी तिला परत न घेतल्याने तिने पोटासाठी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बसस्थानकावर भीक मागण्यास सुरुवात केली. यातूनच तिला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले.

याबाबत बालकल्याण समितीला दिलेल्या निवेदनात ती म्हणाली, माझ्यावर अनेकांनी अत्याचार केले आहेत. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेकवेळा गेले, परंतु पोलिसांनी दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्याऐवजी, माझ्यावर एका पोलिसाने अत्याचार केला. पीडितेने या आठवड्यात पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर, बालविवाह प्रतिबंध कायदा, पॉस्को आणि भारतीय दंड संहितेच्या बलात्कार आणि विनयभंगाच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच रविवारी बीडचे पोलीस अधीक्षक राजा रामासामी यांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असल्याची माहिती दिली.

Exit mobile version