पदावरुन हटविण्याचे कोकण आयुक्तांचे आदेश
। पाली/वाघोशी । वार्ताहर ।
रासळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेंद्र राजाराम खाडे यांनी विद्यमान सरपंच प्रणिता प्रवीण खाडे यांना यांनी कर्तव्यास कसूर केल्याबद्दल त्यांना पदावरून हटविण्यासाठी कोकण आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. आयुक्तांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार सरपंचांना दोषी ठरवत पदावरुन हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार नरेंद्र खाडे यांनी कोकण आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले होते. की, सरपंच प्रणिता प्रवीण खाडे यांनी कायद्याने बंधनकारक असलेल्या ग्रामसभा घेतलेल्या नाहीत, माहितीचा अधिकार विषय ग्रामसभेत घेतलेला नाही, तसेच ग्रामपंचायत लेटरहेडच्या वापर करून ग्रामपंचायतीत हद्दीतील कंपनीत कॉन्ट्रॅक्टची मागणी केली होती. या सर्व गोष्टी कर्तृत्वात कसूर व पदाचा गैरवापर होतो असे तक्रारीत नमूद केले होते. कोकण आयुक्तांनी सदरहून तक्रारीची गंभीर दखल घेत दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना चौकशी करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. दि. 31 मार्च 25 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचा अहवाल आयुक्तांना सादर केलेला होता. दि. 15 एप्रिल 2025 रोजी आयुक्तांनी सदरहून पक्षकारांना नोटीस देऊन सुनावणी घेतली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा अहवाल विचारात घेऊन आयुक्त कोकण विभाग यांनी सरपंच प्रणिता खाडे यांना दोषी धरून अर्जदार यांचा अर्ज मान्य केला व सरपंचपद रिक्त करण्याचे आदेश दिले. पदाचा गैरवापर व मनमानी काम करणार्या सरपंचाचे पद रिक्त केल्याने रासळ ग्रामपंचायत हद्दीत आयुक्तांच्या आदेशाचे कौतुक होत आहे, अशी माहिती रासळचे माजी सरपंच नरेंद्र खाडे यांनी दिली.