ढेकळांचे पंचनामे करायचे का?
| नाशिक | प्रतिनिधी |
कृषीमंत्री माणिकराव काकोटा यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करायला गेले होते. त्यावेळी कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या कृषीमंत्र्यांविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसाने नाशिकमधील कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कृषी मंत्र्यांचे हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे ठरले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
शेतात असलेले कांद्याचेच फक्त पंचनामे होणार, घरात असलेल्या कांद्याचे होणार नाहीत, ते नियमात बसत नाही. उभ्या पिकांचे रितसर पंचनामे होतील, असेही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. माणिकराव कोकाटे शुक्रवारी नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले. मागील आठवडाभरात महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतात असणारी पिके सडली आहेत. कांदा, आंबा, भुईमुगाच्या शेंगासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला गेल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. फडणवीस सरकारकडून नुकसान झालेल्यांना भरपाई मिळेल, अशी घोषणा करण्यात आली. लवकरच नुकसानीचे पंचनामे केले जातील, पण त्याआधीच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानामुळे वाद उफाळून आला आहे.
कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?
मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांना समज द्यावी अन्यथा शेतकरी आणि काँग्रेसच समज देईल, असा इशारा काँग्रेसचे प्रधेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वायफळ बडबड करुन शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. आधी या मंत्र्याने शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली, कर्जमाफीतून शेतकरी मुलींची लग्ने करतात, साखरपुडे करतात, अशी मुक्ताफळे उधळली. आता त्यांनी ढेकळाचे पंचनामे करू का? असा उद्धट प्रश्न केला आहे. या कृषीमंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या मंत्र्याला समज द्यावी अन्यथा काँग्रेस व शेतकरीच त्यांना योग्य ती समज देतील, असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे.
आधी भिकाऱ्याशी तुलना
कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना भिकारी संबोधून आणि कर्जमाफीच्या रकमेचा वापर लग्नासाठी होतो, असे विधान करून वाद ओढवून घेतला होता. या ताज्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी आणि शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोकाटे यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा केला आहे.