| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात डिझेल, गांजा विक्रीच्या घटना वाढत आहेत. या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी रायगडच्या नव्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षकांच्या आदेशामुळे अवैध धंदेवाल्यांना दणका मिळाला आहे.
जिल्ह्यामध्ये डिझेलतस्करीबरोबरच गुटखा, अवैध दारु विक्री, निर्मिती तसेच मटका जुगार, क्लबसारखे धंदे राजरोसपणे सुरु आहेत. या धंद्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका निर्माण झाला होता. गांजा, मटका जुगारसारख्या अवैध धंद्याच्या आहारी तरुणाई जाण्याची भीती निर्माण झाली होती. तक्रार करूनही कारवाई होत नव्हती. अवैध धंदे चालविणाऱ्यांची गुंडगिरी वाढली होती. सोमनाथ घार्गे यांची बदली झाल्यानंतर रायगडच्या पोलीस अधीक्षक म्हणून आंचल दलाल यांनी दहा दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला. रेवदंडा येथे गांजा प्रकरणानंतर त्यांनी अवैध धंदे चालकांविरोधात कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यांच्या या आदेशाने अवैध धंदे चालकांना दणका मिळाला आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घेतलेल्या या भूमिकेबाबत रायगड जिल्ह्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.