दोन मुले गंभीर जखमी
। ठाणे । प्रतिनिधी ।
कल्याणमध्ये एका खासगी शाळेची भिंत कोसळली. यात ढिगाऱ्याखाली अडकून एका 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, आणखी दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील बल्याणी परिसरातील एसके नगरजवळ केबीके इंटरनॅशनल ही खासगी शाळा आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शाळेची धोकादायक झालेली भिंत शेजारील श्री कृपा चाळीवर कोसळली. यावेळी तेथे काही लहान मुले खेळत होती. कोसळलेल्या भिंतीखाली अंशुकुमार सिंह (11), अभिषेक साहानी (8) आणि शोएब शेख (6) हे ढिगाऱ्याखाली दबले गेले. स्थानिकांनी तात्काळ भिंतीचे दगड, माती बाजूला करून मुलांना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच अंशुकुमार सिंह याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर दोन्ही जखमी मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
धोकादायक भिंतीकडे शाळेचे दुर्लक्ष
केबीके शाळेची भिंत धोकादायक झाली होती. भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले होते. चाळकऱ्यांनी यापूर्वीच शाळा व्यस्थापनाला धोकादायक भिंत दुरुस्त करावी अशी विनंती केली होती. मात्र, शाळा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली, असा आरोप नागरिकांनी केला. तर, शाळेचे ट्रस्टी सुबराव खराडे यांनी शाळेची भिंत तीन वर्षापूर्वी बांधली असून ती धोकादायक नसल्याचे सांगत रहिवाशाचे आरोप फेटाळले आहेत.