। पाली । वार्ताहर ।
उपायुक्त पुरवठा कोकणभवन, जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड अलिबाग यांचा आदेशाने सर्व रेशन कार्डधारकांचे मेंबर व्हेरिफिकेशन करावयाचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने सुधागड तालुक्यात मेंबर व्हेरिफिकेशनचे काम वेगाने सुरू आहे. जे लाभार्थी व्हेरिफिकेशन करून घेणार नाहीत ते शासनाकडून मिळणार्या धान्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सर्व रेशनकार्डधारकांनी मेंबर व्हेरिफिकेशन करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले आहे. यासाठी रेशनकार्डमध्ये नोंद असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड घेऊन संबंधित रास्त भाव दुकानात जाऊन आधारकार्ड आणि अंगठ्याचा ठसा ई पॉस मशीनवर द्यावयाचा आहे. जे कुटुंब कामानिमित्त मुंबई किंवा इतर ठिकाणी आहेत त्यांनी तेथील जवळच्या रेशनदुकानात जाऊन हे व्हेरिफिकेशन करायचे आहे. ही प्रक्रिया करण्यात रेशन दुकानदाराना अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षांच्या आतील मुलांचे तसेच वयस्कर व्यक्तींचे अंगठे येत नसल्याने त्यांचे व्हेरिफिकेशन होत नाही. काही कार्डधारक हे बाहेर गावी असल्याने त्यांची अडचण निर्माण होते आहे. काही ठिकाणी नेटवर्क नसल्याने त्याठिकाणी पॉस मशीनवर अंगठे देण्यात त्रास होत आहे.