5 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
| कोलाड | प्रतिनिधी |
छुप्या मार्गाने काळ्या बाजारात रेशनिंग विक्री करणाऱ्या रेशनिंग धारकाला कोलाड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. त्याच्याकडून 5 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मारुती देव्हारे व पोली शिपाई पांचाळ हे रविवारी (दि.5) रात्रीच्या सुमारास गारभट व खरबाचीवाडी येथे गस्त घालत होते. त्यावेळी गारभट बाजूकडून एक सफेद रंगाची पिकअप गाडी प्लास्टिकच्या कपड्याने पॅक करून येताना दिसली. त्या गाडीला थांबवून चौकशी केली असता वाहन चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. संशयाने गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत रेशनिंग दुकानातील गहू व तांदळाच्या 41 गोणी दिसून आल्या. या गोणी गारभट येथील रेशनिंग दुकानदार शरद उर्फ नाना शिंदे यांच्याकडून भरून पाली-सुधागड येथील ललित फुलचंद ओसवाल यांच्याकडे नेत असल्याचे वाहन चालक दिपक दंत यांनी सांगितले. या पिकअपमध्ये 50 किलोच्या 25 गोणी अंदाजे एका किलोला 20 रुपये प्रमाणे 1,250 किलो वजनाचे 25 हजार रुपये, तसेच गव्हाच्या 50 किलो वाजनाच्या 16 गोणी अंदाजे एका किलोची किंमत 20 रुपये असे एकूण 800 किलोचे 16 हजार रुपये असे महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेले 41 हजार रुपयांचा माल व 5 लाख रुपयांची गाडी असे एकूण 5 लाख 41 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.





