विमानाच्या डिझाईनला जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक
| अलिबाग | भारत रांजणकर |
कॅलिफोर्निया, अमेरिका येथे पार पडलेल्या एसएई इंटरनॅशनल एरो डिझाईन चॅलेंज 2022 वेस्ट या स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील शहापूरचा सुपुत्र रतिश संतान पाटील याने पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांतून ‘गरुडाश्व’ या एरोनॉटिकल टीममध्ये डिझाईन डिपार्टमेंटचे नेतृत्व केले. या स्पर्धेत त्याने केलेल्या वणवे विझविण्यासाठी पाणीवाहू विमानाच्या केलेल्या डिझाईनमुळे जागतिक स्तरावर भारताला प्रथम क्रमांक मिळाला. या त्याच्या डिझाईनमुळे जगभरातील जंगलांना लागलेले वणवे रोखण्यासाठी मदत होणार आहे.
शहापूर येथील संतान सुदाम पाटील व यशोदा संतान पाटील या दांपत्याचा रतिश हा पुत्र असून तो आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे येथे मेकॅनिकल शाखेत तिसऱ्या वर्षात पदवी घेत आहे. एरोनॉटिकल या क्षेत्रात त्याचे विशेष प्राविण्य आहे. दिनांक ८ ते १२ एप्रिल २०२२ ला एसएई इंटरनॅशनल एरो डिझाईन चॅलेंज 2022 वेस्ट ही स्पर्धा कॅलिफोर्निया, अमेरिका येथे पार पडली. या स्पर्धेत जगातील ७० देशाच्या विद्यापीठांचा समावेश होता. त्यात भारतातील पुणे येथील आॅल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘गरुडाश्व’ या एरोनॉटिकल टीममध्ये डिझाईन डिपार्टमेंटचे रतिश संतान पाटील याने नेतृत्व केले.
रतिश पाटील याने १२ फूट लांबीचे रेडिओ कंट्रोल्ड विमानाचे डिझाईन केले. हे विमान बॅटरी पाॅवरने चालणार असून ट्रान्समीटरद्वारे त्याचे नियंत्रण करण्यात येणार आहे. या विमानाद्वारे जंगलातील वणवे विझवण्यासाठी पाण्याची वाहतूक करण्यात येणार आहे. एका फेरीत हे विमान ८ लिटर पाण्याची वाहतूक करु शकणार आहे. एक विमान बारा वेळा उड्डाण करुन ९६ लिटर पाण्याची वाहतूक करुन जंगलातील वणव्यांवर पाण्याची फवारणी करुन आग नियंत्रित करण्यास मदत करु शकेल. जागतिक पातळीवर ३ लिटर पाण्याची वाहतूक करणारी अशी विमाने आहेत. परंतु रतिशने ८ लिटर पाणी वाहून नेणाऱ्या विमानाचे डिझाईन केल्यामुळे जागतिक पातळीवर आग विझविणाऱ्या यंत्रणांसाठी ते वरदान ठरले आहे. त्याच्या या डिझाईनमुळे जागतिक स्तरावर भारताला प्रथम क्रमांक मिळाला आहे. ग्रामीण भागातील रतिशने हे यश संपादन केल्याबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.